You are currently viewing ज्येष्ठांनी गाजवली “स्वामी” गीत गायन स्पर्धा

ज्येष्ठांनी गाजवली “स्वामी” गीत गायन स्पर्धा

*आमदार अजय चौधरी, माजी महापौर निर्मला सामंत- प्रभावळकर यांची खास उपस्थिती*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

“स्वामी” सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन अॅण्ड एन्व्हायरमेंट संस्थेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ६ वर्षांपूर्वी “विरंगुळा” नावाचा उपक्रम सुरू केला. ह्या उपक्रमातर्फे मुंबई आणि आसपासच्या परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी “भव्य गीत गायन स्पर्धा” मंगळवार ९ जानेवारी, २०२४ रोजी भावसार सभागृह, परमार गुरूजी मार्ग, परळ, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. हौशी गायक आणि तेही ज्येष्ठ असा जबरदस्त मिलाफ ह्या निमित्ताने उपस्थित श्रोतृवर्गाने अनुभवला. ८६ पार केलेले घाडी मास्तर हार्मोनियमवर सकाळपासून संध्याकाळ पर्यंत अविरत सगळ्या गायकांना साथ देत होते तर ८० पार केलेले स्पर्धक आपलं गीत सादर करत होते. जगभरातली अशी पहिलीच स्पर्धा असावी ज्या स्पर्धेत पहिल्या फेरीत उत्तीर्ण न झालेलेही अंतिम फेरीत पोहचलेल्या स्पर्धकांना प्रोत्साहन देत शेवटपर्यंत सभागृहात थांबले होते. हेच आयोजकांचं आणि त्यांना साथ देणार्‍या सर्वांचं यश आहे.

 

सकाळच्या सत्रात उद्योगपती बाबुभाई सोलंकी, उद्योगपती दिलीपभाई जैन, उद्योगपती मयुर कांतिलाल साकरिया, अॅड. धनंजय पाठक, रमेश धात्रक, मुंबई फेसकॉमचे अध्यक्ष शरद डिचोलकर, परीक्षक महापौर पुरस्कार प्राप्त चंद्रकांत साखरपेकर, तुषार खानोलकर, मनोज कदम आणि स्वामीचे कार्याध्यक्ष मोहन कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन करण्यात आले. त्याचवेळी स्वामीच्या ज्येष्ठ गायकांनी “खरा तो एकची धर्म” ही प्रार्थना सादर करून सभागृह भारावून टाकले.

 

एकामागे एक हौशी ज्येष्ठ स्पर्धक येत होते आणि परीक्षकांसाठी आव्हान निर्माण करत होते. व्यासपीठावरून खाली येताच स्वामीचे कार्यकर्ते स्पर्धकांना सन्मानपूर्वक सहभाग प्रमाणपत्र देत होते. सर्व स्पर्धकांसाठी तो जणू एक पुरस्कार सोहळाच होता. स्पर्धा केवळ नावाला उरली होती. तो जणू स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झाला होता. शाळासोबती कित्येक वर्षांनी एकत्र भेटल्यानंतर जो आनंद असतो तोच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता. ह्या सार्‍यावर कळस म्हणजे स्वामीचे वादक कलाकार जे संपूर्ण कार्यक्रमासाठी वाद्यवृंद सांभाळत होते. त्यात दत्ताराम घाडी, नंदकिशोर आरोंदेकर, दिलीप मेस्त्री, मंगेश तळगावकर, शैलेश तुम्मा, राजरत्न कदम आणि शिवाजी गावकर हे परीक्षकांसोबत स्पर्धकांचीही दाद मिळवत होते. अंतिम फेरीच्या मध्यंतरात स्वामीचे हौशी ज्येष्ठ गायक राजरत्न कदम यांनी अनुप जलोटांचं “एैसी लागी लगन” हे भजन सादर केलं आणि सारा माहोल भक्तीरसात न्हाऊन गेला.

 

कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आणि आयोजक तसेच स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी विभागीय आमदार तसेच शिवसेना (उबाठा) गटनेते अजय चौधरी यांनी हजेरी लावली होती. गीत गायन स्पर्धेसाठी मला आयोजकांनी मला बोलावलं याचं मला आश्चर्य वाटलं, कारण गाण्याचा आणि माझा तसा काही संबंध नाही. पण माझ्या हाताची थाप कोणत्या योग्य जागी पडल्यानंतर जो नाद उमटतो आणि त्यानंतर जी कामं होतात ते आयोजकांनी अचूक हेरलं असावं, असं ते म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ निर्माण झाला.

 

बक्षिस समारंभाकरीता माजी महापौर अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर, फेस्कॉमचे अध्यक्ष शरद डिचोलकर, उर्मिला जाधव, नाना पालकर स्मृती समितीचे विश्वस्त किरण करलकर, मुकुंद सावंतअसे विविध क्षेत्रातले मान्यवर सभागृहात हजर होत होते.

 

परीक्षक चंद्रकांत साखरपेकर, तुषार खानोलकर, मनोज कदम, गुरुदत्त वाकदेकर यांनी चोख परीक्षण करताना प्रथम क्रमांक भरत कस्तुर, द्वितीय क्रमांक गणेश करलकर, तृतीय क्रमांक प्रिया बेर्डे तर उत्तेजनार्थ मंजु कुलकर्णी आणि अनिल पडवळ यांना गायकी, उच्चार, सादरीकरण यांच्या एकत्रित गुणांकणाच्या आधारे जाहीर केला. विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

 

सकाळचा चहाकॉफी नाष्टा, दुपारचं जेवण आणि संध्याकाळी पुन्हा चहा कॉफी बिस्किट असा बेत स्वामीच्या आयोजकांनी सर्वांसाठी ठेवला होता. स्पर्धकांबद्दल प्रकर्षाने एक नमूद करावसं वाटतं, ज्येष्ठ असले तरी सगळे शिस्तबद्घ पद्घतीने संपूर्ण दिवसभर कार्यक्रमात वावरत होते. रांगेत चहाकॉफी सोबत नाष्ट्याचा आस्वाद घेत होते. दुपारच्या जेवणाच्या वेळीही स्वयंशिस्तीने जेवणाच्या जागी अधीक गर्दी न करता जागा होईल त्याप्रमाणे उभे राहून किंवा बसून जेवणाचा आस्वादही घेत होते. आजच्या तरूणाईने यांच्याकडून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे. संपूर्ण दिवसभर ह्या स्पर्धेचं सूत्रसंचालन न थकता, सर्वांना सांभाळून घेत, स्पर्धा सातत्याने प्रवाहित ठेवण्याचं काम अनिल तावडे यांनी चोख बजावलं. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोहन कटारे, सुरेंद्र व्हटकर, प्रदीप ढगे, राजरत्न कदम, कांतीलाल परमार, वैशाली शिंदे, विमल माळोदे, प्रतिभा सावंत, रचना खुळे, साध्वी डोके, ममता खेडेकर, जयश्री भोसले, सुमंगल गुरव, गीता नाडकर्णी, नम्रता पडवळ, स्वाती मयेकर, प्रतिभा सपकाळ, विष्णू मणियार, गोविंद राणे, नितीन तांबे आणि उल्हास हरमळकर यांनी अविरत मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा