सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी ठरले पात्र..
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२३-२४ च्या जिल्हास्तर टप्प्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या नवोपक्रम स्पर्धेत दाभोली नं. २ चे पदवीधर शिक्षक श्री प्रशांत चिपकर यांच्या ‘पाठ्यविषयाचे जीवनाशी जोडले नाते, अध्ययन अध्यापन झाले आनंददायी आणि सोपे’ या नवोपक्रमास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी यांच्या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे प्रतिवर्षी आयोजन केले जाते.
सन २०२३-२४ या वर्षी देखील या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विविध पाच गटात घेण्यात येत आहे. त्याच्यामध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक, विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती व अध्यापकाचार्य, पर्यवेक्षीय अधिकारी या गटांचा समावेश आहे. सदर स्पर्धे अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरील टप्प्याचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्यामार्फत नुकतेच करण्यात आले होते. या टप्प्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक उपक्रमशील शिक्षकांनी आपले नवोपक्रम सादर केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाभोली नं २, वेंगुर्ले चे पदवीधर शिक्षक श्री प्रशांत चिपकर यांनी सादर केलेल्या नवोपक्रमासाठी जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. त्याचबरोबर त्यांचा नवोपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. सलग तिसऱ्या वर्षी श्री प्रशांत चिपकर यांचा नवोपक्रम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्याने त्यांच्यावर शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे प्राचार्य माननीय श्री सुशील शिवलकर त्याचबरोबर ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री कांबळे सर, श्री जाधव सर व डॉक्टर आचरेकर सर, वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारी माननीय श्री संतोष गोसावी, सुरंगपाणी केंद्रप्रमुख माननीय श्री नितीन कदम सर, शाळा मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सहकारी शिक्षक पालक विद्यार्थी व शिक्षण प्रेमी यांनी त्यांचे अभिनंदन केले व राज्यस्तरावरील टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या.