You are currently viewing केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी विधेयकाला विरोधी पक्ष जाणूनबुजून करताहेत विरोध

केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी विधेयकाला विरोधी पक्ष जाणूनबुजून करताहेत विरोध

माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी केला पत्रकार परिषदेतून आरोप

कुडाळ
देशातील कृषी क्षेत्रात क्रांती व्हावी शेतकरी समृद्ध, सशक्त- आर्थिक संपन्न व्हावा, शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन व्हावे या स्तुत्य हेतूने केंद्र सरकारने नवीन कृषी विधेयक आणले असे असतानाही देशावर गेली ७० वर्षे राज्य करणाऱ्या व शेतकऱ्यांना अंधारात दरीत ठेवण्याचे पाप करून शेतकऱ्यांसाठी काहीच न करणारे व काही लहान मोठे विरोधी पक्ष या जाणूनबुजून विधेयकाला विरोध करतात आहेत, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेतून नाव न घेता काँग्रेस पक्षावर व इतर विरोधी पक्षावर केला. कुडाळ येथे नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, जिल्हा प्रतिनिधी राजु राऊळ, डॉ. मिलिंद कुलकर्णी, नगराध्यक्ष ओंकार तेली, महिला मोर्चा प्रमुख संध्या तर्से, बंड्या सावंत, कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे आदी उपस्थित होते. यावेळी नारायण राणे म्हणाले, केंद्र सरकारने कृषी सुधार अधिनियम विधेयक आणले. त्यानंतर विरोधी पक्षाने शेतकरी आंदोलन सुरू केले. त्यामुळे या कृषी विधेयक बिलाची माहिती सर्वांना व्हावी या करिता प्रबोधन व्हावे त्यासाठी भाजपाच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर याही पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल कुठच्याही बाजारपेठेत, परदेशात थेट विकता यावा, त्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, त्यांच्या जीवनात परिवर्तन घडावे व समृद्धी यावी, शेतकरी सशक्त व्हावा याच स्तुत्य हेतूने केंद्र सरकारने हे कृषी विधेयक आणले. या विधेयकामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची थेट विक्री देशातच नव्हे तर परदेशातही करता येणार आहे. त्यामुळे दलाल स्थानिक गुंड यांचा उपद्रव तसेच त्यांची फसवणूक होणार नाही. विकलेल्या शेतमालाची किंमत त्यांना तीन दिवसात मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात नक्कीच परिवर्तन घडणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक देश एक बाजार ही घोषणा केली. आता या कृषी विधेयकामुळे त्यांची घोषणा व त्यांचे स्वप्न हे खरे ठरत आहे असेही त्यांनी सांगितले. देशाच्या २०१३-१४ मधील कृषी क्षेत्राच्या आर्थिक बजेट पेक्षा आता २०२० चे कृषी क्षेत्रातील बजेट हे सहा पट जास्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या कृषी क्षेत्रातील ध्येय धोरणामुळे देशातील कृषी क्षेत्राची अर्थव्यवस्था बळकट होईल व त्याचा फायदा निश्चित देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृषी विधेयक हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचे व त्यांच्या जीवनात परिवर्तन करणारे असतानाही गेली ७० वर्ष देशावर राज्य करताना शेतकऱ्यांना मात्र अंधारात दरीत ठेवण्याचे पाप करणाऱ्या सरकारने व काही लहान मोठ्या विरोधी पक्षाने या नवीन कृषी विधेयकाच्या विरोधात चुकीचे गैरसमज पसरवून शेतकऱ्यांचे आंदोलन पंजाब हरियाणा च्या सीमेवर सुरू केले आहे. नवीन कृषी विधेयक आले तरीही कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच ज्या काही गोष्टी अगोदर सुरू होत्या त्या बंद होणार नाहीत. विरोधक मात्र याबाबत चुकीच्या माहिती देत आहेत. मात्र शेतकऱ्यांना जिथे फायदा मिळेल तिथे त्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्याबाबत स्वातंत्र्य मिळणार आहे. अशीही माहितीही त्यांनी दिली. लवकरच या कृषी विधेयकाच्या समज गैरसमजाबाबत जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या चर्चासत्राचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + eighteen =