*नेहमीप्रमाणे महावितरणची बत्ती गुल…*
सावंतवाडी :
सावंतवाडी शहरात आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने आपली जोरदार झलक दाखवली. वाऱ्यासह अचानक पावसाने सुरुवात करताच महावितरणची शहरातील बत्ती गुल झाली. त्यामुळे एकीकडे पावसाचे थैमान तर दुसरीकडे अंधाराचे साम्राज्य अशी परिस्थिती निर्माण होऊन अनेकांची त्रेधातिरपीट झाली.
गेले दोन दिवस जिल्ह्यात असलेली थंडीची लाट ओसरली होती, ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्याचबरोबर उष्णतेने घामाच्या धारा सुद्धा वाहत होत्या परिणामी पावसाची शक्यता वाटत होती. वातावरणातील या लहरी बदलाने आज रात्री १०.०० वाजताचा मुहूर्त साधून सावंतवाडी शहरावर काही मिनिटे मुसळधार सरींची बरसात केली. सावंतवाडीचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा आज चराठे येथे जत्रोत्सव सुरू होता. अवकाळी पावसाने जत्रोत्सवातील आनंदावर विरजण टाकले. पावसाची तयारी नसलेल्या व्यापाऱ्यांची मात्र धांदल उडाली. पावसामुळे जत्रोत्सवासाठी आलेले अनेक भाविक निराश होऊन घरी परतले, त्यामुळे व्यापारी वर्गाचेही नुकसान झाले.