You are currently viewing स्मृति भाग २०

स्मृति भाग २०

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग २०*

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

 

*आचतुर्वदनो ब्रम्हा द्विबाहुरपरो हरिः ।*आभाललोचनः शम्भु भगवान्बादरायणः ॥*

ज्यांना चार तोंडे नाहीत तरी जे ब्रम्हा आहेत , दोनच हात असूनसुद्धा जे हरि ( नारायण ) आहेत , कपाळावर तिसरा डोळा नसून जे शंकर आहेत , अशा भगवान बादरायणाला म्हणजे व्यासांना मी नमस्कार करतो .

काय वर्णन आहे ! व्यासांच्या या शक्तीचा माणूस पृथ्वीतलावर जन्मला असेल त्यांचेनंतर ! असे खचितसुद्धा वाटणार नाही ? म्हणून तर व्यासपौर्णिमा ! मला माझीच एक कविता पुन्हा इथे उद्धृत करावीशी वाटते ! आपल्या सर्वांचे अनुमतीने ती देत आहे .

 

 

🌹 *कुरुकुलाचे अध्वर्यु —*

*भगवान वेद व्यास…..*🌹

 

ब्रह्मा, विष्णु, महेशाला पडलेलं

ऐतिहासिक स्वप्न म्हणजे…व्यास !

शारदेनं केलेला समंत्र करन्यास

म्हणजे….व्यास !!

 

नाव पाणी कापत होती

नावेतली मत्स्यगंधा हर्षाने कंपित होत होती

पराशर ऋषिंच्या मानस सरोवरात

विचारांचे वल्हे कामनेचे अंतर कापत होते

आणि अचानक…….

पराशरांचा नेत्रशर मत्स्यगंधेच्या मनाची अपरा छेदून गेला

अन्

अवतीर्ण झाले “वेदव्यास ”

 

शब्दगंगा ज्यांचे विचारपुष्प पुनीत करते

व्याकरणाची गिरिशिखरं ज्यांचं तेज पिण्यासाठी स्पर्धा करतात

ज्यांच्या लिखाणाचे खण सालंकृत आहेत

आणि……आणि…

भावनांचे मायाजाल टाकून

भीष्मांपासून परिक्षितापर्यंत

एकही मासा नासू नये म्हणून

विद्येची देवता ज्यांच्या हृदयकुटिराचा

आश्रय घेवून रहाते

त्यांनीच लिहिली

भारताच्या जाज्वल्य इतिहासाची सुवर्णपाने !

खरंच सांगतो

अक्षरांच्या अर्थानेदेखिल अपसव्य केले नाही ?!

केवढे कार्य !!

 

मी जे लिहितो ते देखिल त्यांचेच “उष्टे ” असेल

तर…..

वर्तमानकालीन शास्त्रज्ञांची काय कथा ?

दृष्टी थिटी पडते कारण

आमचा ” असंस्कृतपणा ” ??

 

आईवडिलांचे प्रेमामुळे बंधुत्व प्राप्त झालेल्या

भीष्मांचे शब्दास मान देवून

नियोग केला व्यासांनी …

अन्यथा ” योगच” आयुष्यभर !

 

देवासाठी जगणे मरणे

हेच ध्येय जन्मांती ।

कृतिशीलांच्या जीवनास या

मृत्यु ही विश्रांती ।।

केवढी कमाल !!!!

 

ह्या ऐतिहासिक स्वप्नाच्या मृत्युची दखल

इतिहासदेखिल ठेवू शकला नाही !

म्हणूनच तर ते “चिरंजीव” ?

 

अशा ह्या ज्ञानियांचा सूर्य असलेल्या चंद्राचा

क्षय कधी होईल का ?

म्हणून ” व्यासपौर्णिमा ” !

” नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे “🙏

——

विनंती इतकीच , व्यास स्मृति व इतरही स्मृति वाचनीयच आहे . वाचाल ना ?🙏🙏 उद्या काही श्लोक पाहू .

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 8 =