You are currently viewing टीम इंडियाने केपटाऊनमध्ये पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकला, रोहित शर्माने केली धोनीची बरोबरी

टीम इंडियाने केपटाऊनमध्ये पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकला, रोहित शर्माने केली धोनीची बरोबरी

*टीम इंडियाने केपटाऊनमध्ये पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकला, रोहित शर्माने केली धोनीची बरोबरी*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सात गडी राखून जिंकला. गुरुवारी (४ जानेवारी) सामन्याच्या दुसर्‍या दिवशी टीम इंडियाने ७९ धावांचे लक्ष्य तीन गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह भारताने इतिहास रचला. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात त्यांनी प्रथमच विजय मिळवला आहे. या विजयासाठी भारताला ३१ वर्षे वाट पाहावी लागली.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पहिल्या सामन्यात एक डाव आणि ३२ धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. केपटाऊनमध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. त्यांच्यासमोर यजमान संघाचा पराभव झाला. मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यासारखे कर्णधार जे करू शकले नाहीत, ते रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली केले. कर्णधार म्हणून त्यांच्यापैकी कोणालाही येथे विजय मिळाला नाही.

दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर दुसऱ्यांदा कसोटी मालिका अनिर्णित ठेवण्यात भारतीय संघाला यश आले. गेल्या वेळी २०१०-११ मध्ये असे घडले होते. तेव्हा महेंद्रसिंग धोनी कर्णधार होता. टीम इंडियाने पहिली कसोटी हरल्यानंतर दुसरी जिंकली आणि तिसरा सामना अनिर्णित राहिला. आता तिथे मालिका ड्रॉ करणारा रोहित शर्मा दुसरा कर्णधार ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय चुकीचा ठरला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ ५५ धावांवरच मर्यादित राहिला. त्यानंतर भारत १५३ धावांवर सर्वबाद झाला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचा पहिला डाव आटोपला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यजमानांनी दुसऱ्या डावात १७३ धावा केल्या. त्यामुळे भारताला ७९ धावांचे लक्ष्य मिळाले. तीन गडी गमावून भारताने हे लक्ष्य गाठले.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात कमी षटकांत निकाल लागलेला सामना होता. हा सामना अवघ्या १०७ षटकांत संपला. याचा अर्थ या सामन्यात केवळ ६४२ वैध चेंडू (नो आणि वाईड चेंडू वगळता) टाकण्यात आले. यापूर्वी १९३२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना १०९.२ षटकात संपला होता. तो सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.

सामन्याच्या पहिल्या दिवशी २३ गडी बाद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल निश्चित होता. पहिल्या डावात बढत घेतल्यानंतर भारताचा विजयही जवळपास निश्चित दिसत होता. मात्र, दुसऱ्या दिवशी एडन मार्करामच्या शतकाने भारताची प्रतीक्षा वाढवली. आफ्रिकेच्या फलंदाजाने १०३ चेंडूत १०६ धावा करत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या १७६ पर्यंत नेली. त्याच्याशिवाय संघाचे फक्त तीन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. डीन एल्गर १२ धावांसह संघाचा दुसरा सर्वोत्तम धावा करणारा खेळाडू ठरला. त्यांच्याशिवाय बेडिंगहॅम आणि मार्को जॅनसेनने ११ धावांचे योगदान दिले.

भारताकडून जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात सहा विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय मुकेश कुमारने दोन विकेट घेतल्या. सिराज आणि कृष्णा यांना प्रत्येकी एक यश मिळाले. बुमराहने सहा विकेट घेत अनेक विक्रम केले. आफ्रिकन भूमीवर तीन वेळा पाच बळी घेणारा तो दुसरा भारतीय ठरला. त्याच्या आधी जवागल श्रीनाथने हे केले होते. मोहम्मद शमीला मागे टाकत आफ्रिकन भूमीवर विकेट घेण्याच्या बाबतीतही तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. बुमराहच्या नावावर ३८ विकेट आहेत. त्याच्यापेक्षा श्रीनाथ (४०) तर कुंबळे (४५) पुढे आहे.

सामन्याच्या चौथ्या डावाची सुरुवात दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्राने झाली. भारतासमोर विजयासाठी ७९ धावांचे लक्ष्य होते आणि भारतीय फलंदाजांना जास्त वेळ लागला नाही. रोहित आणि यशस्वी यांनी पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३४ चेंडूत ४४ धावांची भागीदारी केली. यशस्वी २२ चेंडूत २८ धावा करून बाद झाला, मात्र तोपर्यंत अर्धे काम झाले होते. यानंतर शुभमन गिलही बाद झाला, पण रोहित आणि कोहलीने भारताला विजयाच्या जवळ नेले. शेवटी विराट कोहलीही बाद झाला, मात्र श्रेयसने विजयी धावा काढत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा