लेखक डॉ. महेश अभ्यंकर यांचे नीट-जेईई संदर्भात करिअर मार्गदर्शन संपन्न
सावंतवाडी संस्थान मराठा समाज कुडाळ व सावंतवाडी संस्थान मराठा समाज भगिनी मंडळ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज ग्लो- डर्मा कंपनीचे डायरेक्टर, औषध निर्माण तज्ज्ञ व उत्तम संशोधक, लेखक डॉ. महेश अभ्यंकर यांचे नीट-जेईई संदर्भात करिअर मार्गदर्शन संपन्न झाले.
सावंतवाडी संस्थान मराठा समाज भगिनी मंडळ कुडाळ च्या अध्यक्ष सौ अदिती सावंत यांच्या हस्ते डॉ. महेश अभ्यंकर यांचे स्वागत करण्यात आले. व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज व बापूसाहेब महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
आपण ज्या मातीत मोठे झालो, त्या मातीचे आणि समाजाचे देणे लागतो , आपल्या सारखीच ही मुलं पुढे जावून डॉक्टर इंजिनीअर , ज्या क्षेत्रात जातील तिथे त्यांनी आपलं नाव करावं त्यासाठी आधी त्या क्षेत्रात जाण्यासाठी असलेल्या प्रवेश परीक्षा कशा चांगल्या मार्क्सनी पास व्हाव्यात , त्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करण्याचा वसा डॉ. अभ्यंकर यांनी घेतला. 10वी, 11वी, 12 वी च्या मुलांना शहरात खेडोपाडी, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावून विद्यादानाचे हे महन काम त्यांनी सुरू ठेवलं आहे. मुलांना
करियर, NEET ,JEE मार्गदर्शनासाठी मोठ्या शहरात यावं लागतं, वेळ, राहण्याची गैरसोय, आणि काहीवेळा पैसा या गोष्टींमुळे पालकांना ते जमत नाही, त्यामुळे आपणच जावून मुलांसाठी हे काम केलं पाहिजे,या भावनेने डॉ. अभ्यंकर मुलांसाठी मोफत मार्गदर्शन करतात. अनेक मुलांना त्याचा फायदा होत आहे.
आजच्या या मार्गदर्शन शिबिरात डॉ. महेश अभ्यंकर यांनी ‘सक्सेस मंत्राज टू क्रॅक जेईई- नीट’ या विषयांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी दहा मंत्र सांगितले. प्रत्येकाच्या आयुष्यात छोट्या छोट्या सक्सेस स्टोरीज असतात. त्यातूनच माणूस खूप पुढे जातो, असे ते म्हणाले. मोठा विचार करा मोठी स्वप्ने बघा. अकरावीपासूनच अभ्यासास सुरुवात करा. दिवसाचे किमान १५ तास अभ्यास करा. अमूल्य वेळ वाचवा. आयुष्यात ध्येयप्राप्तीसाठी नियोजन करा. एमसीक्यू परीक्षेत यशस्वी होण्याचा मूलमंत्र म्हणजे मेमरी, अॅक्युरसी, स्पीड, टाईम मॅनेजमेंट, एरर फ्री आणि कॉन्फिडन्स. आईवडिलांचा चांगला पाठिंबा मिळवा त्यांची मदत घ्या. उजळणी करा, जास्तीत जास्त पेपर सोडवण्याचा सराव करा. शारीरिक स्वास्थ्य जपा. बाहेरचे खाद्यपदार्थ यळा. मानसिक तणाव कमी करण्यासाठी तुमचे छंद जोपासा. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी व सकारात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी प्रेरणात्मक कथा, ऐका, वाचा. स्वतःला प्रेरित करा. स्वतःचे कौतुक करा. सफल आयुष्यासाठी आध्यात्मिक स्वास्थ्य जपा त्यासाठी मंत्र, स्तोत्र, योगा करा. प्रार्थनांवर विश्वास ठेवा. ‘सक्सेस इज नेव्हर अॅन एक्सीडेंट’ अकरावी व बारावी हे दोन वर्ष कठोर परिश्रम घ्या. अभ्यास करा. तुम्हाला जेईई- नीटची सीट मिळणारच असा आत्मविश्वास डॉ. महेश अभ्यंकर यांनी विद्याथ्यांना दिला. प्रगती करणे हे त्या विद्याथ्यांनीच स्वतः ठरवायचे आहे. विचार, कृती, सवय, व्यक्तिमत्व, भाग्य हा क्रम तुमच्या आयुष्यात खूपच महत्त्वाचा आहे असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे, प्रश्नांचे निरसन त्यांनी केले.
व्यासपीठावर सावंतवाडी संस्थान मराठा समाज कुडाळचे कमिटी प्रमुख श्रीयुत आर एल परब, समन्वयक श्री नंदू गावडे, सावंतवाडी संस्थान मराठा समाज कुडाळ भगिनी मंडळाच्या अध्यक्षा सौ अदिती सावंत, उपाध्यक्ष सौ स्वाती सावंत, या भगिनी मंडळाच्या सदस्या डॉक्टर सौ दिपाली काजरेकर मॅडम उपस्थित होत्या तसेच श्री राजु परब यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ स्वाती सावंत व कार्यक्रमाचे आभार या भगिनी मंडळाच्या सचिव सौ वेदिका सावंत यांनी मानले