You are currently viewing फसवणूक न होण्यासाठी सजग राहावे- आरती देसाई.

फसवणूक न होण्यासाठी सजग राहावे- आरती देसाई.

फसवणूक न होण्यासाठी सजग राहावे- आरती देसाई.

वैभववाडी येथील राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात केले मार्गदर्शन.

वैभववाडी

ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचवून त्यांना त्यांच्या हक्क व कर्तव्याची जाणीव व्हावी यासाठी २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. आपली फसवणूक होऊ नये यासाठी सजग असले पाहिजे, फसवणूक झाल्यास गप्प न बसता तक्रार करावी आणि न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी आरती देसाई यांनी केले.
जिल्हा प्रशासन, तहसील कार्यालय वैभववाडी आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी आरती देसाई यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन वैभववाडी येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर वैभववाडी तहसीलदार दीप्ती देसाई, नायब तहसीलदार भावना शिंदे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य सदस्य व जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन. पाटील, जिल्हा संघटक श्री.सीताराम कुडतरकर, तालुका अध्यक्ष तेजस साळुंखे, अशासकीय सदस्य महेश संसारे, नाशिरभाई काझी, भालचंद्र साठे, जयेंद्र रावराणे, उपनगराध्यक्ष संजय सावंत, व्यापारी संघाचे अध्यक्ष रत्नाकर कदम आदी उपस्थित होते.
आरती देसाई म्हणाल्या आज ऑनलाईन खरेदी केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना कायद्याची जागरूकता असणे गरजेचे आहे. आपली फसवणूक झाल्यास त्याबाबत तक्रार करणे आणि त्या तक्रारीचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. त्याचवेळी या चळवळीची जनजागृती लोकांपर्यंत पोहोचली असे म्हणता येईल. ग्राहकांनी संघटित होऊन अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे. ग्राहक चळवळीतच्या माध्यमातून न्याय मिळवणे सुलभ होते. त्यामुळे या चळवळीत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे असे अध्यक्षीय मनोगतात आरती देसाई यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय ग्राहक चळवळीचे अधिष्ठान स्वामी विवेकानंद आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले.
भारतीय ग्राहक चळवळ, बिंदुमाधव जोशी यांचे ग्राहक चळवळीतील योगदान, ग्राहक संरक्षण कायदा १९८६ आणि नवीन ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मधील तरतुदी आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे कार्य याबाबत प्रा. श्री. एस. एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकाने घ्यावयाची काळजी या विषयावर तेजस साळुंखे यांनी माहिती दिली.
दि.२४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच संस्थेच्या जळगांव येथील राज्य अधिवेशनामध्ये सहभागी झालेल्या प्रतिनिधींना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्यावतीने दिला जाणारा कोकण विभागातील उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२३ सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे संघटक श्री.सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांना जाहीर झाला होता. त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.
यावेळी श्री.नागेश कदम, श्री.महेश संसारे, श्रीम.श्रध्दा कदम, श्री. शैलेंद्रकुमार परब, श्री. सिताराम कुडतरकर व ॲड. प्रताप सुतार आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. या जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा कार्यालयातील कर्मचारी, तहसील कार्यालयतील अधिकारी, कर्मचारी, दुकानदार, व्यापारी, रेशनिंग दुकानदार, पोलीस पाटील, व्यापारी मंडळाचे पदाधिकारी, शासकीय कार्यालयांचे प्रमुख, ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार श्री. संदीप हांगे यांनी मांडले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजीवनी पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका पुरवठा निरीक्षक श्री. रामेश्वर दांडगे, त्यांचे सहकारी आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र- वैभववाडी तालुका शाखा यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा