जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर…
६ जानेवारीला सिंधुदुर्गनगरीत होणार वितरण:एकूण ९ जणांना पुरस्कार जाहीर
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार समितीचे २०२३ चे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार कणकवली येथील चंद्रशेखर तांबट, ग्रामीण पत्रकार पुरस्कार मालवण मसुरे येथील दत्तप्रसाद पेडणेकर, युवा पत्रकार पुरस्कार वैभववाडी येथील श्रीधर साळुंखे यांना तर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सिंधुदुर्गनगरी येथील दैनिक सकाळचे प्रतिनिधी नंदकुमार आयरे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण ६ जानेवारी २०२४ रोजी मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार समितीच्या कार्यकारिणीची आज सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर भवन येथे पुरस्कार निवडीसाठी बैठक संपन्न झाली. यावेळी पुरस्कार निवडी निश्चित झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी घोषणा केली. यावेळी उपाध्यक्ष बाळ खडपकर, सचिव देवयानी वरसकर, सहसचिव महेश रावराणे, सदस्य महेश सरनाईक, राजन नाईक, संतोष राऊळ, आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष तोरसकर यांनी अन्य पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दोडामार्ग गणपत डांगी, सावंतवाडी अवधूत पोईपकर, कुडाळ प्रमोद म्हाडगुत, वेंगुर्ला प्रथमेश गुरव, देवगड दयानंद मांगले यांचा समावेश आहे. ६ जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या बाळशास्त्री जांभेकर स्मारक तथा पत्रकार भवन येथे यावर्षीचा पत्रकार दिनाचा कार्यक्रम प्रथमच होत आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून संपादक वसंत भोसले, रेल्वे पोलीस आयुक्त तथा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ रवींद्र शिशवे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर तसेच जिल्ह्यातील खासदार सर्व आमदार यांना निमंत्रित केले आहे. हा कार्यक्रम सकाळी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत होणार आहे, असे यावेळी तोरसकर यांनी सांगितले.
तसेच पत्रकार भवनाच्या वर्धापन दिना निमित्त 20 फेब्रुवारीला विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या दिवशी पत्रकारांच्या मुलांनी क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवले त्यांचा गुणगौरव कार्यक्रम होणार आहेत, असे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी सांगितले.