You are currently viewing “‘गाव ते महानगर’ इतिहासाचा जागर!” – डॉ. पी. डी. पाटील

“‘गाव ते महानगर’ इतिहासाचा जागर!” – डॉ. पी. डी. पाटील

*”‘गाव ते महानगर’ इतिहासाचा जागर!” – डॉ. पी. डी. पाटील*

पिंपरी

“‘पिंपरी – चिंचवड गाव ते महानगर’ हा ग्रंथ पिंपरी – चिंचवडच्या समग्र इतिहासाचा जागर करतो!” असे गौरवोद्गार डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे सोमवार, दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी काढले. श्रीकांत चौगुले लिखित आणि संवेदना प्रकाशननिर्मित ‘पिंपरी – चिंचवड गाव ते महानगर’ या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पद्मश्री गिरीश प्रभुणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ पत्रकार मधू जोशी, लेखक श्रीकांत चौगुले, प्रकाशक नितीन हिरवे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तर महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांच्यासह साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

डॉ. पी. डी. पाटील पुढे म्हणाले की, “गावांचा इतिहास कळला तर गावाबद्दल अधिक निष्ठा आणि अभिमान वाढीस लागतो.दापोडी भागात मी अनेक वर्षे वास्तव्य केले असूनही ब्रिटिशकालीन आणि त्या पूर्वीचा इतिहास ‘गाव ते महानगर’ या ग्रंथामध्ये पहिल्यांदा वाचून मी चकित झालो. संदर्भग्रंथ म्हणून या पुस्तकाची उपयुक्तता खूप मोठी आहे!” मधू जोशी म्हणाले की, “श्रीकांत चौगुले यांनी अथक परिश्रम घेऊन पिंपरी – चिंचवडचा ज्ञात – अज्ञात इतिहास साक्षेपाने संकलित केला आहे!” श्रीकांत चौगुले यांनी आपल्या मनोगतातून, “वीस वर्षांपूर्वी या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली; पण संदर्भग्रंथ म्हणून सातत्याने मागणी असल्याने द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन केले. ‘गाव ते महानगर’ या ग्रंथाचा दुसरा भाग लवकरच प्रकाशित करण्याचा मनोदय आहे!” अशी माहिती दिली. गिरीश प्रभुणे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “श्रीकांत चौगुले हे व्यासंगी व्यक्तिमत्त्व असल्याने भावी काळातही त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या ग्रंथांचे लेखन घडावे!” अशी अपेक्षा व्यक्त करून पुढे म्हणाले की, “तसेच औद्योगिकरणामुळे विकसित झालेल्या या भागातल्या प्रत्येक गावाचे वेगळे वैशिष्ट्य आणि इतिहास आहे. चिंचवडगाव मोरया गोसावी आणि देवस्थानमुळे सर्वपरिचित आहे. भोसरीला इसवी सन पूर्व काळापासूनचा वारसा लाभला आहे. याप्रमाणे प्रत्येक गावाची काही ना काही वैशिष्ट्ये आहेत. या सगळ्याची मांडणी या ग्रंथात समाविष्ट आहे म्हणूनच भावी काळासाठी या ग्रंथाचे मूल्य अनमोल आहे!”

याप्रसंगी शोभा जोशी आणि राजेंद्र सोनवणे यांनी मान्यवरांनी ग्रंथाला दिलेल्या अभिप्रायांचे अभिवाचन केले. गावकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून राजाभाऊ गोलांडे, अरुण बोऱ्हाडे, संदीप तापकीर, ब. हि. चिंचवडे, चंद्रकांत काटे, संभाजी बारणे यांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. धनश्री चौगुले, सुरेश कंक, शरद काणेकर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. कैलास भैरट यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा