एसटी परवानाधारकांनी संघटनेची ताकद वाढविण्यासाठी सहकार्य करा : राम हराल
कणकवली
राज्यातील एसटी स्थानकांतील कॅन्टीन, स्टाॅल, रसवंतीगृहांसह आस्थापनाधारक परवानाधारक कोरोना महामारीतील टाळेबंदी, एसटीच्या कर्मचार्यांचा संप, घटलेली प्रवासी संख्या आदी कारणांमुळे आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आला आहे. त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न चालू आहेत. तरी परवानाधारकांनी संघटनेची ताकद वाढविण्यासाठी त्यांना विभागीय स्तरावर देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारुन संघटनेची ताकद वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र एस टी कॅन्टीन व स्टाॅलधारक परवानाधारक वेल्फेअर असोशिएशनचे अध्यक्ष राम हराल यांनी केले आहे.
असोशिएशनची राज्य स्तरीय प्रादेशिक बैठक छ. संभाजीनगर येथील अलंकार हाॅटेलमध्ये झाली. त्यावेळी अध्यक्ष पदावरून हराल बोलत होते. यावेळी सचिव विजय ऐथाल, पदाधिकारी गणपत तथा भाई चव्हाण, योगेश मुकुंदे, मारुती तुपेकर, प्रदिप गुप्ता, दिनेश गुप्ता, अरुण बंडेवार यांच्यासह बहुसंख्य जिल्हांतील पदाधिकारी, परवानाधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिव विजय ऐथाल यांनी परवानाधारकांचे कोरोना कालावधीतील टाळेबंदी, अंशतः टाळेबंदी, एसटी कर्मचाऱ्यांना संप आदीं कारणांमुळे आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आला आहे. त्यांना या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आम्ही पदाधिकारी गेली ३ वर्षें या कालावधीतील परवाना शुल्क माफीसाठी विविध पातळीवर प्रयत्न करीत आहोत. या दरम्यान परवानाधारकांना विभागीय पातळीवर परवाना शुल्क भरण्यासाठी अनेक नोटीसांद्धारे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र आम्ही संघटनात्मक पातळीवर या आदेशांना वारंवार स्थगिती मिळवली, असे स्पष्ट करून ते म्हणाले, बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे शुल्क माफी संदर्भातील निर्णयाला विलंब झाला. आता हा निर्णय अंतीम टप्यात आला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वंच परवानाधारकांनी संघटना वाढीसाठी आणि संघटनात्मक निर्णयाच्या पाठीशी उभे राहून सहकार्य करण्यासाठी पुढे यायला पाहिजे.
उपस्थित पदाधिकाऱ्यानी टोकाच्या निविदांच्या स्पर्धामुळे आणि आपापसातील हेव्यादाव्यांमुळे परवानाधारकांच्या समोर नेहमीच शुल्क वाढीची भिती पोटात गोळा आणायची. संघटनात्मक पातळीवर आपण विना निविदा १४ वर्षांची सलग मुदत वाढवून घेतली. परवानाधारकांसमोर अजूनही काही नव्या समस्या निर्माण होत आहेत. त्यावर मात करण्यासाठी संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन केले.