You are currently viewing महाराष्ट्राच्या नाट्यचळवळीत आचरेकर प्रतिष्ठानचे योगदान मोठे

महाराष्ट्राच्या नाट्यचळवळीत आचरेकर प्रतिष्ठानचे योगदान मोठे

महाराष्ट्राच्या नाट्यचळवळीत आचरेकर प्रतिष्ठानचे योगदान मोठे.

सां.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे प्रतिपादन

आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात ४६ व्या नाथ पै एकांकिका स्पर्धा

कणकवली

संसदपटू बॅ. नाथ पै, मधू दंडवते यांच्या कार्याचा विसर आजच्या पिढीला पडला आहे. अशास्थितीत त्यांच्या कार्याचा वसा पुढे नेण्याचे काम वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. महाराष्ट्राच्या नाट्यचळवळीत आचरेकर प्रतिष्ठानचे योगदान मोठे आहे. गेली ४६ वर्षे नाथ पै एकांकिका स्पर्धा आयोजित करण्याचा आचरेकर प्रतिष्ठानचा उपक्रम स्तुत्य असून प्रतिष्ठानच्या यापुढील प्रत्येक उपक्रमास आपण सर्वतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली.

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यावतीने येथील आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात ४६ व्या नाथ पै एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी श्री. सर्वगोड बोलत होते. यावेळी परीक्षक डॉ. सतीश साळुंखे, सुहास भोळे, अनिल कांबळे, आचरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अँड. एन. आर. देसाई, दामोदर खानोलकर, राजन राऊत, प्रसन्ना देसाई, लीना काळसेकर, सीमा कोरगावकर आदी उपस्थित होते.

सर्वगोड म्हणाले, आजच्या पिढीला महापुरुषांच्या कार्याचा विसर पडला आहे. ही मोठी शोकांतिका आहे. प्रत्येकाच्या हृदयात प्रेम व संवेदनशील असेल तरच माणूसपण टिकून राहणार आहे. तसे न झाल्यास माणूसपण जिवंत राहणार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

कोकणाच्या विकासात बॅ. नाथ पै, मधू दंडवते यांचे मोठे योगदान आहे, हे योगदान आजच्या पिढीला समजून सांगणे गरजेचे आहे. आचरेकर प्रतिष्ठान नाट्यरसिकांच्या पाठबळावर गेली ४६ वर्षे नाथ पै एकांकिका स्पर्धेचे आयोजन करते ही बाब अतुलनीय आहे. बॅ. नाथ पै, मधू दंडवते यांचे विचार व कार्य पुढे नेण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आरंभी मान्यवरांचे हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ झाला. स्वागत अँड एन. आर. देसाई व दामोदर खानोलकर केले. प्रास्ताविकेत शरद सावंत यांनी मान्यवरांचा परिचय करून देत संस्थेच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. या कार्यक्रमाला माजी गटविकास अधिकारी विजय चव्हाण, नीलेश पवार, मनोज मेस्त्री,धनराज दळवी व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा