*जागतिक साहित्य कला विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री नीला बर्वे (सिंगापूर) लिखित अप्रतिम लेख*
*वैविध्यपूर्ण ख्रिसमस, गोव्यामधील !!*
ख्रिसमस! ख्रिस्ती लोक ज्याला देवाचा पुत्र मानतात त्या येशू ख्रिस्ताच्या जन्माचे स्मरण करणारा वार्षिक सण, जो प्रामुख्याने 25 डिसेंबर रोजी जगभरातील अब्जावधी लोकांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जातो ‘ख्रिसमस’ हे नाव मास ऑफ क्राइस्ट (किंवा येशू) वरून आले आहे. एक सामूहिक सेवा (ज्याला कधीकधी कम्युनियन किंवा युकेरिस्ट म्हटले जाते) जेथे, आपल्यासाठी यातना सोसून येशू मरण पावला आणि नंतर पुन्हा जिवंत झाला याचे ख्रिस्ती स्मरण करतात.
येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही.बायबलमध्ये कोणतीही तारीख दिलेली नाही, मग आपण तो २५ डिसेंबरला कां साजरी करतो? तो केव्हा साजरा केला जावा याविषयी सुरुवातीच्या ख्रिश्चनांमध्ये नक्कीच अनेक तर्क होते. रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन ( पहिला ख्रिश्चन रोमन सम्राट) याच्या काळात सन ३३६ मध्ये प्रथमच २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केल्याची नोंद आहे,परंतु यावेळी हा अधिकृत रोमन सण नव्हता.सुरुवातीच्या काळांत चर्चेस ख्रिसमस 6 जानेवारी रोजी साजरा करीत, त्यावेळी एपिफनी (ज्याचा अर्थ येशू हा देवाचा पुत्र होता हे प्रकटीकरण) आणि येशूचा बाप्तिस्मा देखील साजरा केला जात असे.मात्र ज्यू लोकांचा दिव्यांचा सण, हनुक्का हा किस्लेव्ह २५ च्या पूर्वसंध्येला सुरू होतो (ज्यू कॅलेंडरमधील महिना, जो डिसेंबरमध्ये त्याच वेळी येतो). येशू ज्यू होता, म्हणून हे आणखी एक कारण असू शकते की चर्चेसनी ख्रिसमसच्या तारखेसाठी २५ डिसेंबर ही तारीख निवडली. ख्रिश्चनांसाठी, मात्र येशूची अचूक जन्मतारीख जाणून घेण्यापेक्षा, मानवतेच्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी देव मनुष्याच्या रूपात जगात आला असे मानणे, हा ख्रिसमस साजरा करण्याचा मुख्य उद्देश मानला जातो.
आता जगभरातील लोक ख्रिसमस साजरा करतात,ख्रिश्चन असो वा नसो.विशेषतः लहान मुलांना तर फारच प्रिय कारण त्यांना सांताक्लाज भेटवस्तू देतो. २४ डिसेंबरच्या रात्री जगभरातील मुले उशाशी मोजा ठेवून झोपतात. असा मोजा तुम्हीही खेळण्यांनी भरला असेल, हो ना?
जगभर ख्रिसमस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो (याचे एक प्रमुख कारण या काळात हवा सुखद असते.त्यानंतर हिवाळा सुरु होतो, बर्फवृष्टीमुळे कित्येक दिवस घरीच अडकून पडायला होते.दरवर्षी, एकट्या युनायटेड स्टेट्समध्ये 30-35 दशलक्ष खऱ्या ख्रिसमस ट्रीज विकल्या जातात. त्याही १५ वर्षे जोपासल्यावरच त्यांची विक्री होते.असा अनेक गमतीशीर गोष्टी सगळीकडे आहेत, पण आज आपण बघणार आहोत गोव्यात साजरा होत असलेला ख्रिसमस!
१९६० पर्यंत गोव्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते आणि ख्रिसमसला पोर्तुगीजमध्ये नाताल/ नताली म्हणतात ,त्यामुळे गोव्यात आजही कोकणी भाषेत या सणाला नाताल असे म्हणतात,त्याचाच पुढे महाराष्ट्रात नाताळ झाला.१५१० मध्ये पोर्तुगीजांनी गोवा जिंकल्यानंतर आणि त्यानंतरच्या पोर्तुगालच्या शासनानंतर, गोव्याच्या स्थानिक लोकसंख्येचे रोमन कॅथलिक धर्मात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले गेले.गोवा शहर पूर्वेला ख्रिश्चनीकरणाचे केंद्र बनले असेच म्हणायला हवे.तेव्हापासून नाताल या नांवाने गोव्यात ख्रिसमस मोठ्या धामधूमीने साजरा केला जातो. त्याला आणखीही काही जोड दिली जाते.
एकेकाळी ‘रोम ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखले जाणारे जुने गोवा! बॅसिलिका ऑफ बॉम जीझससह अनेक वसाहती इमारती, कॉन्व्हेंट आणि चर्च आहेत, ज्या युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत आहेत आणि भारताच्या पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे त्या संरक्षित आहेत. तर ख्रिसमसआधीच सेंट फ्रान्सिसच्या वार्षिक समारंभाने लोक गोव्यात येऊ लागतात. ३ डिसेम्बर, सेंट फ्रान्सिसची पुण्यतिथी! सेंट फ्रान्सिस झेवियर हे १५४२ मध्ये मिशनरी म्हणून गोव्यात आले. ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी गोव्यात पाऊल टाकणाऱ्या जेसुइट नेत्यांपैकी ते पहिले होते आणि पुढील दहा वर्षांमध्ये त्यांनी अनेक लोकांना ख्रिश्चन धर्मात रूपांतरित केले. वयाच्या केवळ ४६ व्या वर्षी १५५२ मध्ये एका चिनी बेटावर तापाने त्यांचा मृत्यू झाला आणि काही वर्षांनी त्यांचे पार्थिव गोव्यात आणून चांदीच्या कॅस्केटमध्ये ठेवण्यात आले असून दर १0 वर्षांनी ते जनतेला दर्शनासाठी उघडण्यात येते.त्यावेळी तर मोठ्या प्रमाणांत लोक देश-विदेशांतून येतातच पण दरवर्षी ३ डिसेम्बरला हजारो लोक बॅसिलिका ऑफ बॉम जीझस येथे जमतात. हा वार्षिक उत्सव, सेंट फ्रान्सिस झेवियर किंवा गोईंचे सायबाचे फेस्ट, (लॉर्ड ऑफ गोवा फेस्टिव्हल) म्हणून ओळखला जातो, हा गोव्यातील सर्व ख्रिश्चन सणांपैकी सर्वात मोठा सण आहे आणि ९ दिवसआधी २३ नोव्हेंबरपासून रोज सकाळी मास आयोजित केलेला असतो. हजारो लोक उपस्थित असलेल्या या चर्चच्या परिसराला जत्रेचे स्वरूप आलेलं असतं.आजूबाजूच्या गावांतील शेतकरी,कलाकार, घरगुती व्यवसाय करणाऱ्यांना आपल्या वस्तू ,फळफळावळ विकण्यासाठी आणि ग्राहकांना सर्व माल एकाच जागी आणि स्वस्तात उपलब्ध होण्याची पर्वणी असते. या जत्रेस गोव्याला फेरी असे संबोधतात.सर्वचजण फेरीची आतुरतेने वाट पाहत असतात. माझ्या गोव्यातील ८ वर्षांच्या वास्तव्यात अगदी दुर्मिळ भाज्यांपासून शिंपल्यांच्या, वेताच्या,नारळाच्या करवंट्यांच्या विविध वस्तू,बिडाचे तवे…. अनेक उपयुक्त, संग्राह्य वस्तू खरेदी केल्या आहेत ज्या आजही वापरांत आहेत.
चर्चच्या मागील परिसरांत मोठ्ठा लांबलचक मांडव घालून लोकांना जागा विनाशुल्क उपलब्ध करून दिली जाते.जगभरातून येणारे लोक, गावागावांतील विक्रेते ग्रुप्सने आपले जेवण रांधतात,रहातात. ३ डिसेम्बरला गोवा राज्यांत सार्वजनिक शासकीय सुटी असते.सकाळच्या मासपासून रात्रीपर्यंत हजारो लोकांची रीघ लागलेली असते सेंट फ्रान्सिसचा आशीर्वाद घेण्यासाठी!
४ डिसेम्बरपासून फेरी पणजी शहरांत येते.छोटे छोटे शेकडो स्टॉल्स, काही फूटपाथवर माल पसरून….मांडवी नदीच्या बाजूच्या प्रशस्त फूटपाथवर ..मांडवी हॉटेल पासून पार कला अकादमीपर्यंत पाय ठेवायला जागा नाही एवढी गर्दी असते. संध्याकाळपासून या काळात बहुदा कोणी घरी जेवत नाही तर रोज निरनिराळे पदार्थ चाखत फिरत असतात.मध्येमध्ये डज, ओर्केस्टा ..तुमची गाणं गायची हौसही येथे पुरी होऊ शकते. पणजी शहर तर पुलापासून दोनापावलापर्यंत दिव्यांच्या रोषणाईने लखलखत असतं.
जगभर ख्रिसमस साजरी करायची पद्धत असते ती इथे आहेच, उदा. बेथलेहेमचा तारा…. पाच-बिंदू असलेला तारा, केवळ मॅथ्यूच्या जन्माच्या कथेच्या गॉस्पेलमध्ये संदर्भित असल्यामुळे आपण जसे दिवाळीत आकाशकंदील लावतो तसे ख्रिश्चन घरासमोर चांदण्या (स्टार्स) लावतात.आपण किल्ले बनवितो ते crib बनवितात, विविध प्रकारचे केक्स,एकमेकांकडे जाणे, प्रार्थना,ख्रिसमस ट्री सजविणे , त्याच्याजवळ भेटवस्तू ठेवणे आणि २५ तारखेला सर्वानी त्या उघडून आनंद साजरा करणे, गावांतून सांताक्लॉजची वेशभूषा करून मुलांना फुगे ,चॉकलेट्स वाटत घोडागाडीतून फिरवून आणणे, ख्रिसमस संगीत आणि कॅरोलिंग, ख्रिसमस कार्ड्सची देवाणघेवाण, चर्च सेवा….हे सर्व जगासारखे गोव्यातही होतेच पण काही गोष्टी इथे खास असतात .
गोव्यातील बाजारातील ठिकाणे टिन्सेलने सुशोभित करतात.ठिकठिकाणी, मोठ्या ख्रिसमस ट्रीज उभारून त्या सजवितात.२०/२५ दिवस आधीपासूनच,साधारण फेरी संपली की सर्वत्र पारंपारिक गोवा ख्रिसमस केक (वाइन आणि ड्राय फ्रूटने बनवलेला) मिळू लागतो.घरोघरी गूळ, काजू आणि नारळाच्या दुधापासून जेली पुडिंग.. डोडोल आणि सुकामेवा आणि नारळापासून न्यूरो बनविणे सुरु होते.आपण जसे म्हणतो, रेसिपी तीच पण प्रत्येकीच्या करंजी, लाडवांची चव निराळी तसे माझ्या ऑफिसमध्ये मी विविध चविष्ट डोडोल आणि न्यूरो चाखले आहेत.
२४ डिसेंबरला रात्री पणजी येथील चर्च ऑफ अवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कॉन्सेप्शन (ज्याचा उल्लेख पणजी चर्च असा केला जातो) येथे, मिडनाईट माससाठी शेकडो स्थानिक येतात.बरोब्बर रात्री १२ वाजता बेल वाजू लागतात आणि मास सुरु होतो.तेथून २ मिनिटस् अंतरावर मी रहात असल्याने बेलचा आवाज घरी सहज ऐकू येई. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी चॅपेलसमोर मांडव घातलेला असतो आणि आपण जसे गणपतीत विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम करतो तसेच कार्यक्रम येथे (विशेषतः:मुलांचे) संध्याकाळपासून सुरु असतात.तसेच, तियात्र हा interesting traditional Goan performance मी येथेच प्रथम पहिला.यांत छोटे ६/७ acts असतात ज्याला पोड्डे( Podd’dde)म्हणतात .हा नाट्यमय कलाप्रकार गोव्यात फारच लोकप्रिय आहे. अनेक कलाकार यातूनच पुढे येतात. मी रहात होते तो भाग फॉन्टेनहास! हेरिटेज म्हणून जाहीर झालेला. बहुतेक सर्व बंगले २०० /२५० वर्षांपूर्वीचे, पिढ्यानपिढ्या पारंपरिकता जपणारे. त्याच भागातील चॅपेलसमोर मी तियात्र प्रथम पहिले. ते पाहण्यासाठी विविध देशांतील लोक जमतात.
गोव्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे मांडवी नदीतील क्रूझ! वर्षानुवर्षे एकाच जागी असलेले कॅसिनो क्रूझ ज्यासाठी पैसे उधळायला लोक येतात ते वेगळे.पण अत्यंत सुशोभित केलेल्या क्रूझवरुन मांडवी नदीत दीर्घ फेरी मारायची मजा काही औरच. वेलकम ड्रिंकने सुरुवात करून,लोकनृत्य पाहत डेकवर कुठेही फिरू शकता.कांही वेळाने या लोकनृत्यांत सामील होण्यासाठी, डान्स करण्यासाठी आवाहन केले जाते आणि मग हळूहळू सारे सामील होऊन वातावरण धुंद होते. जे प्रेक्षक म्हणून रहाणे पसंत करतात तेही तरल वातावरणाचे भाग बनतातच.नदीतून रोषणाईने झगमगणारे शहर आणि चमकणारे आकाश, समोर अथांग पाणी थंडगार हवेत बघतांना मस्त वाटते.
मघाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे जसे दिवाळीला किल्ले बनवितात तसे येथे क्रिब….येशूचे जन्मस्थान…गोठ्याची प्रतिकृती बनवितात. या ख्रिसमस क्रिबमध्ये शिशु येशू, त्याची आई, मेरीआणि वडील जोसेफ, मेंढपाळ, मेंढ्या आणि देवदूत, शेतातील इतरही प्राणी उदा. बैल, उंट, गाढव, थोडक्यांत ‘गॉस्पेल ऑफ मॅथ्यू’मध्ये वर्णन केलेली सर्वजण येथे हजेरी लावतात.गोव्याचे वैशिष्ठय म्हणजे चर्चतर्फे घरगुती आणि सार्वजनिक अशा क्रिबच्या दोन स्पर्धा आयोजित केल्या जातात. बक्षिसांची रक्कमही मोठी असते.(सरकारी अनुदान त्यासाठी दिले जाते.) त्यामुळे घरोघरी लहान मुले तर अति उत्साही असतातच पण घरातील मोठी मंडळी त्यांना पाठींबा देत मदतही करतात.माझ्या गोव्यातील वास्तव्यात विविध ठिकाणी,जिथे बदली होईल तिथे राहिले आणि प्रत्येकवर्षी घरमालकाच्या मुलांना, आजूबाजूच्या मुलांना क्रिबसाठी हातभार लावण्याचा आनंद घेतला.नाक्यानाक्यांवर उभे केलेल्या या प्रतिकृती बघत फिरायला खूप मजा येते. रात्रीची जेवणं झाली की घरमालकीण आवाज देई, “चल गो”, आणि आजूबाजूच्या सगळ्यांबरोबर हास्यविनोद करीत ,मागच्या वेळचा बरा होता की ह्यो ..अशा चर्चा करीत, रोषणाई बघत मस्त रपेट होई.सर्वांत मोठा आणि प्रेक्षणीय पणजीमधील चर्च ऑफ अवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कॉन्सेप्शन समोरचा! दिवसरात्र तेथे गर्दी असते तो पाहण्यासाठी. सार्वजनिक स्पर्धांमध्ये बक्षिसपात्र मंडळांना पुढच्यावर्षी येथे क्रिब करायची संधी दिली जाते.
वर सांगितल्याप्रमाणे पदार्थ असणारी स्वादिष्ट गोअन फेस्त (Feast) खास असते की पक्का खवैय्या कायम लक्षात ठेवेल.यांत डुकराचे मांस सॉरपोटेल, रोस्ट टर्की आणि ग्रील्ड सीफूड,पारंपारिक फ्रूट केक, डोडोल, न्यूरोस, पेराड(Guava cheese) बाथ (नारळाचे दूध आणि रवा यांपासून बनवलेले पोर्तुगीज केक) आणि गोव्यातील सर्वात लोकप्रिय मिष्टान्न, बेबिंका (नारळाचे दूध, लोणी, अंडी आणि पिठापासून बनवलेला एक लेयर्ड केक)समाविष्ट आहे.समुद्रकिनारे, चर्च अथवा घरी या मेजवानीचा आस्वाद कुटुंब , मित्रमंडळी यांच्याबरोबर घेतला जातो.
गोव्याला पार्ट्यांची राजधानी म्हणायला हरकत नाही.आणि ख्रिस्तमस मध्ये तर नाईटलाइफ व इथल्या संगीताचा अनुभव घेण्यासाठी पर्वणीच ! डबस्टेप आणि टिनी ट्रान्स बीट्सवर तुम्ही ताल धरू लागता तर जिव्ह, वॉल्ट्झ आणि फॉक्स-ट्रॉट यांच्या स्थानिक बँडच्या थंपिंग बीट्सवर पाय थिरकू लागतात. तरुणाईची बेहोशी काय त्याचा इथे प्रत्यय येतो आणि सारेच वय विसरून संगीताने धुंद झालेले! वागातोर व अंजुना येथे रेव्ह पार्ट्या असतात तर आशियातील सर्वात मोठा संगीत महोत्सव म्हणून ओळखला जाणारा, इलेक्ट्रॉनिक म्युझिक एक्स्ट्रावागांझा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय आणि भारतीय संगीतकारांच्या कलागुणांचे प्रदर्शन करणारा,सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल, याच सुमारास येथे असतो. आपापल्या आवडीप्रमाणे मौज लुटण्यासाठी जगभरांतून रीघ उगाच नाही लागत. गोवेकर मात्र गर्दी टाळण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांवरील निवांत जागा निवडून कुटुंबियांबरोबर, मित्रमंडळींबरोबर धमाल करतांना दिसतात. शाळा- कॉलेजना सुट्टी आणि गोव्यातील अनेक तरुण परदेशी नोकरी/व्यवसायासाठी गेलेले आहेत ,अगदी घरटी १/२ सुद्धा. ते सर्व दरवर्षी ख्रिसमससाठी घरी परत येतात.त्यामुळे घरोघरी आनंद असतो आणि ख्रिसमस सेलिब्रेशन सेंट फ्रांसिसच्या उत्सवापासून ..नोव्हेंबर २३ पासून सुरु होते ते पार नववर्ष साजरे करेपर्यंत. मी गोव्याला गेले तेव्हां दिवाळीत आकाशकंदील लावला बाल्कनीत,पण ख्रिसमसला मालकीणबाईंनी चांदणी (स्टार )आणून लावली. आवडले मला आणि पुढच्यावर्षी मीच छोटे छोटे आकाशकंदील बनविले. मग चांदण्याच्या आकाराचे दोन कंदील आणले , त्यांच्या प्रत्येक टोकाला छोटे कंदील लटकविले आणि एक त्यांच्या व एक वरच्या बाल्कनीत लावले.पोरांना तर मजा वाटलीच( आमचो स्टार युनिक आसा!) पण त्यांचे मॉम, डॅड अगदी ग्रॅनीबाईही खूष ! शेजाऱ्यांनीही “मॅडमचो आयडिया बरा असा,टू इन वन करतालो”…. पावती देऊन टाकली. मग पुढची सारी वर्षे अशीच काही कॉम्बिनेशन्स केली.खेडेगावांत तर,बा..यका ब्रॅन्चमध्ये आल्या की “चडो ख्रिसमसाक येतलो” असे आवर्जून सांगून जात आणि तो आल्यावर “मॅडमिक मिळून यो,” म्हणून धाडून द्यायची. मुलेही प्रेमळ, माझी बदली पणजी येथे झाल्यावर तेथे येऊन भेटून जायची. एकाने तर कमाल केली , “आवयो सय येता” म्हणून तिला ७५ कि.मी. बाईकवरून घेऊन आला भेटायला! मीही भारतात आले की चार दिवस गोव्याला जाऊन सर्वांच्या गाठीभेटी घेते. आता करोनाने यावर्षी येऊ दिले नाही पण या लेखाने खूप आठवणींचे मंथन झाले.लेख लिहिता लिहिता परवा फोन आला एकाचा, “मॅडमनु, तुज्या स्टाइलिन नकेत्र लायला, आवयो तुजी याद काढता.तू केन्ना येतलो? बेगीनुच यो. नातालाचो कुस्वार खाताना तुजी याद येता.” २५ तारखेला व्हिडीओ कॉलचे आश्वासन देतांना डोळे भरून आले. कोकणासारखीच ही गोव्याची माणसेही काळजात शहाळी असलेली! विमानातून जशी दिसायला लागते ही भूमी, तेव्हां मला नेहमी वाटते, या सर्वांच्या प्रेमाची शाल जणु साऱ्या राज्यावर पसरली आहे, म्हणूनच इथल्या सर्व गोष्टींचे, ख्रिसमसचे अप्रूप वाटते,ओढ वाटते.
…..नीला बर्वे,
सिंगापूर .