देवगड :
आदर्श सेवा संघ बांदेगाव रजिस्टर संचालित श्री गणेश मंदिराचा ४५ वा वर्धापनदिन सोहळा मु. बांदेगाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथे दि. २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने आदर्श सेवा संघ बांदेगाव आयोजित स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून दत्तजयंती उत्सव सोहळ्याला भव्य दिव्य पालखी मिरवणूकीने प्रारंभ होईल. महिलांसाठी रास गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक बुवांचे सुस्वर भजन, होमहवन व सामुदायिक गायत्री मंत्र पठण तर दि. २८ रोजी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अंडरआर्म क्रिकेट सामने खेळविले जाणार आहेत. रक्तदान शिबिर, रक्तपेढी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने भरविण्यात आले आहे.
तसेच मोफत आरोग्य तपासणी व नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया डॉ. श्री. बिपिन जोशी, डॉ. स्वाती मिलिंद पोकळे, डॉ. तेजल आदित्य माळगावकर यांच्या सहकार्याने आयोजित केले आहे. महिलांसाठी संगीत खुर्ची घेण्यात येणार असून मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. शनिवार ३० रोजी बांदेगावचे भुषण अशी ओळख असलेले डॉ. प्रा. अंकुश सारंग यांनी कोकणचा गाबीत शिमगोत्सव व गाबीत समाज आणि फागगीते लोकसाहित्य हा ग्रंथ मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. यांचा सार्थ अभिमान गावाला असल्याने त्यांच्या विशेष सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार व दर्याचा राजा मासिकाचे सहसंपादक प्रमोद कांदळगावकर यांच्या हस्ते करण्याचे योजिले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बिपिन जोशी उपस्थित असणार आहेत. यावेळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना व सहभागी स्पर्धकांचा गौरव करण्यात येणार आहे. अशा या मंगलमय सोहळ्यास उपस्थित राहून भक्तगणांनी श्रीच्या दर्शनाचा व श्री सत्यनारायण महापूजा तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आदर्श सेवा संघ बांदेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.