*”मनाचा अन् जगण्याचा निकट संबंध!”*
पिंपरी
“मनाचा अन् जगण्याचा निकट संबंध असतो!” असे विचार ज्येष्ठ लोककवी प्रा. विजय पोहनेरकर यांनी वैष्णोमाता प्राथमिक विद्यामंदिर, इंद्रायणीनगर, भोसरी येथे व्यक्त केले. कवयित्री वंदना इन्नाणी लिखित ‘मन आभाळ आभाळ’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. विजय पोहनेरकर बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे, उद्योजक सुदाम भोरे, प्रा. दिगंबर ढोकले, कवयित्री रजनी अहेरराव, संगीता वेताळ, पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज मराठे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच साहित्यिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची कार्यक्रमात उपस्थिती होती.
प्रा. विजय पोहनेरकर पुढे म्हणाले की, “मन कधी झाकोळतं, कधी भरून येतं; तर कधीकधी भरभरून कोसळतंही! कवयित्री वंदना इन्नाणी यांचं मन आभाळाएवढं आहे!” रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी आपल्या ‘वड म्हणाला, बाई तुला हात जोडले!’ या कवितेच्या सादरीकरणाने रसिकांना खळखळून हसवले; तर ‘संध्याकाळ’ आणि ‘जिंदगानी’ या गेयकवितांनी अंतर्मुख केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी, “कवित्वाला रसिकत्वाचा स्पर्श झाल्यास ती कविता सर्वोच्च पातळीवर पोहचते. ‘मन आभाळ आभाळ’मध्ये मनाचे तुडुंब भरून येणे जाणवते!” असे मत व्यक्त केले. सुदाम भोरे यांनी, “मन आभाळ आभाळ’ या संग्रहातील रचनांमधून सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय येतो!” असे गौरवोद्गार काढले. योगेश लोंढे यांनी, “सुसंस्कृत परिवारातून वंदना इन्नाणी यांची आजपर्यंतची वाटचाल झाली आहे!” अशी माहिती दिली. रजनी अहेरराव यांनी, “वंदना इन्नाणी वृत्ताने अन् वृत्तीने परिपूर्ण असून त्यांच्या कविता नादजन्य आहेत!” असे भाष्य केले; तर संगीता वेताळ यांनी कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य नमूद केले.
कवयित्री वंदना इन्नाणी यांनी आपल्या मनोगतातून, “समाजाच्या हिताची जोपासना करणे हाच माझ्या दृष्टीने ‘साहित्य’ या शब्दाचा अर्थ आहे. वडिलांच्या संस्कारांमुळे मी घडली असून आतापर्यंत आणि यापुढेही साहित्यकृतींमधून मिळणारा संपूर्ण निधी सामाजिक कार्यासाठी प्रदान करणार आहे!” अशा भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘कवी विचार मंच शेगाव’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले; तसेच संयोजनात सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाने कार्यक्रमाचे संयोजन केले. गणेश लिंगडे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश इन्नाणी यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२