*माणगाव खोऱ्यातील आंबेरी नदी पलीकडे खुलेआम जुगाराचे नियोजन*
*जत्रोत्सवांमधील जुगारांना खाकी वर्दीचे पाठबळ*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात जुगारांची नियोजन केले जात आहे. जत्रोत्सवांमध्ये या जुगारांना त्या त्या परिसरातील बीट अंमलदारांचे महत्त्वपूर्ण पाठबळ असून सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांचा मात्र याकडे दुर्लक्ष झालेला दिसून येत आहे. गेली काही वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रोत्सवांमध्ये जुगारांवर बंदी होती. आजही बंदी असताना खाकी वर्दी हात ओले करून जुगारांना पाठबळ देत असल्याचे जत्रोत्सांमध्ये सुरू असलेल्या जुगारांवरून दिसून येते.
आज माणगाव खोऱ्यातील आंबेरी नदीच्या पलीकडे त्या परिसरातील खाकीचे शिलेदार असलेले तुका”राम” “डोई” यांच्या वरदहस्ताखाली जुगाराचे नियोजन झाल्याचे सूत्रांकडून खात्रीलायक वृत्त समजले आहे. माणगाव खोरे कुडाळ तालुक्यातील दुर्लक्षित अशा भागात वसलेले असल्याने त्या ठिकाणची खाकी वर्दी जिल्ह्यापासून अलिप्त असल्यासारखीच वावरत असते. माणगाव येथील खाकीचे शिलेदार आपणच अधिकारी असल्यामुळे त्या ठिकाणी अवैद्य धंद्यांना अभय देताना आढळून येतात. अशाच प्रकारचे अभय आंबेरी नदीपलीकडे सुरू असलेल्या जुगारांना मिळाल्याने राम कानचे, बुकबाल (डबा), कनोज कार्वेकर (गोवा बनावटीच्या दारूचा बादशहा) आदींनी खुलेआम जुगाराचे नियोजन केले आहे. आंबेरी नदीपलीकडील या जुगारासाठी खाकी वर्दीचा वरदहस्त ठेवणारे तुका”राम” “डोई” यांना एका रात्रीसाठी तब्बल 3000 रुपये लाच मिळत असल्याचे देखील सूत्रांकडून समजते.
माणगाव प्रमाणेच बांदा पंचक्रोशी मध्ये काल कोन”ती” जत्रेत स्थानिक खाकी वर्दीच्या आशीर्वादाने पहाटे सहा वाजेपर्यंत जुगार सुरू होते. मंगळवारी वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील जत्रेत जुगाराची पाले पडली होती. तीन पत्ती जुगार मोठी गर्दी होऊन सुरू होता आणि जुगाराकडे पाठ करून खाकी वर्दीचे शिलेदार रस्त्यावरती झोपा काढत उभे होते, असे चित्र संवाद मीडियाच्या प्रतिनिधीला पहावयास मिळाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रोत्सवांमध्ये सुरू झालेल्या जुगारांमुळे अनेक तरुण मुले पैशाच्या हव्यासापोटी जुगारांकडे आकर्षित होत असल्याचे विदारक चित्र दिसत असून सिंधुदुर्ग जिल्ह्याची खाकी वर्दी याला जबाबदार असल्याचे गावागावातील नागरिकांकडून बोलले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तरुण तडफदार पोलीस अधीक्षक जत्रोत्सवांमध्ये सुरू असलेल्या जुगारांकडे कानाडोळा करणार कारवाईचा बडगा उचलणार..? याकडेच जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.