कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने १७ डिसेंबरला मुंबईत”एल्गार सभा”…
सावंतवाडी
रेल्वे प्रशासनाकडून कोकणवासीयांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने १७ डिसेंबरला परळ, मुंबई येथे सकाळी १० वाजता एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यात कोकण रेल्वेवर काम करणाऱ्या २२ प्रवासी संघटनांनी सहभाग घेतला आहे.
सावंतवाडी स्टेशनला सुसज्य टर्मिनस बनवावे व त्याला मधू दंडवते यांचे नाव दयावे. कोकण रेल्वेचे खाजगीकरण न करता त्याचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून त्याचे दुहेरीकरण करण्यात यावे. पश्चिम रेल्वेच्या वसई ते सावंतवाडी रेल्वे तर मध्य रेल्वेच्या कल्याण ते सावंतवाडी रेल्वे सुरू करून नेहमीसाठी दादर-चिपळूण-मेमू, मुंबई रत्नागिरी इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करावी, कोकण रेल्वेवरील बहुतांश रेल्वेना रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी थांबे मिळावेत, रखडलेले चिपळूण कराड, वैभववाडी कोल्हापूर आणि सावंतवाडी बेळगाव या नवीन रेल्वे मार्गाच्या कामांना वेग मिळावा. इत्यादी या मुख्य मागण्या आहेत. या मागण्यांसोबत कोकण रेल्वेचे हॉस्पिटल कोकणात व्हावे, अमृत भारत स्थानक योजना कोकण रेल्वे मार्गावर देखील लागू करावी, सावंतवाडी स्थानकाशेजारी प्रस्तावित रेलोटेल चे काम चालू करण्यात यावे इत्यादी मागण्या या सभेला कोकण रेल्वे संघटना, सावंतवाडी उपस्थित करेल, असे संघटनेचे सचिव मिहिर मठकर यांनी सांगितले.
या एल्गार सभेला कोकणातील जनतेने उपस्थीत राहावे, असे आवाहन कोंकण रेल्वे प्रवासी संगटना, सावंतवाडी चे सचिव मिहिर मठकर यांनी केले आहे.