*शासनाने भात खरेदीवर बोनस जाहीर करावा- आ. वैभव नाईक*
*भाताला बोनस मिळण्यासाठी आ. वैभव नाईक यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत अधिवेशनात मांडला प्रश्न*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी भात शेती करतात. शासनाकडून भात खरेदीवर क्विंटलमागे २१६५ रु दर दिला जाणार आहे.मात्र गेल्या वर्षी शेतकऱ्यांना भातखरेदीवर बोनस देण्यात आलेला नाही.यावर्षी देखील बोनसची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. आता भात खरेदी सुरू झाली असून लवकरात लवकर बोनसची रक्कम जाहीर करावी अशी मागणी आज आमदार वैभव नाईक यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली.
भात खरेदीवर शेतकऱ्यांना बोनस मिळावा यासाठी आ. वैभव नाईक यांनी आमदार राजन साळवी, आमदार रवींद्र वायकर, आमदार ऋतूजा लटके यांच्या समवेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन देखील केले. यावेळी भाताला बोनस मिळालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या.
भात पिकाला चांगला दर मिळावा यासाठी आ. वैभव नाईक यांनी अधिवेशनात वारंवार आवाज उठविला आहे. त्याचबरोबर भात खरेदीवर बोनस रक्कम मिळण्यासाठी देखील ते पाठपुरावा करीत आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वी भात खरेदीवर क्विंटल मागे ५०० रु बोनस रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षी बोनसची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांकडून यावर्षी बोनस रक्कम मिळण्याची मागणी होत आहे.