You are currently viewing कै. नितीन परब च्या आठवणीत

कै. नितीन परब च्या आठवणीत

*सामाजिक कार्यात वाहून घेतलेला, मोठमोठ्या रक्तदान शिबीरांचं आयोजन करत आरोग्य व्यवस्थेला सहाय्य करणाऱ्या कै.नितीन परब (शिरोडा) या सह्रदाचे अलिकडेच निधन झाले. त्याला साहित्यिक विनय सौदागर यांनी वाहिलेली शब्दांजली*

*कै. नितीन परब च्या आठवणीत*

नितीन परब. नितीन आणि माझी कशी मैत्री झाली, हे मला आठवत नाही. खरं बोलायचं तर नितीन आणि माझी मैत्री झालीच कशी? हाच अनेकांचा कुतुहलाचा विषय; कारण आमच्या दोघांमधलं स्वभाव भिन्नत्व. निकिता मॅडम ही तशा परिचयाच्या नव्हत्या, नितीनमुळेच त्यांचा परिचय झाला. माझ्या बालपणी नितीनचे सासरे मात्र आमच्या घरी यायचे. त्यांचं बहुधा तंबाखूचं दुकान होतं. हे देखील मला आठवतंय की, मी काहीवेळा त्यांच्याकडून आमच्या दुकानासाठी तंबाखू विकत आणला होता. हो, सतीश निखार्गे आमच्या घरी येत असंत. हे येणं मुलांच्या शिक्षणासंदर्भात असावं. त्यावेळी पुस्तकांची देवघेव करण्यासाठी बरेच पालक एकमेकांच्या घरी येतजात असंत, त्याचप्रमाणे ते आमच्या घरी येऊन गेलेले आठवतात. अर्थात खूप उशिरा कळलं की, ते नितीनचे सासरे.
एकदा माझ्या एका भावाने मला लांबून नितीनला दाखवलं होतं अन् तुझं काय काम असेल तर त्याला सांगूया असंही म्हटलेलं; पण मी ते तेव्हा टाळलेलं. नंतर काही काळाने तो कसातरी कुठेतरी माझ्या परिचयात आला. पुढे मग रक्तदान शिबिरासाठी ‘सूत्रसंचालन कर’ म्हणाला आणि मी करत राहिलो. मला वाटतं दहा-एक शिबिरांचं तरी मी संचलन केलंय आणि तो माझ्यावर खुश असायचा. ” विनय, माका तुझ्यासारखो एक माणूस हाताकडे होयो होतो. तू गावालय ह्या एक बरा झाला” असं म्हणायचा. माझा सन्मानही त्याने केलेला, जो खरंतर मला नको होता. माझ्या एका बदलीच्या कामात त्याने मला मनापासून मदत केलेली.
आमच्या दोघात महत्त्वाचा दुवा म्हणजे आमच्या दोघांच्या मुली रुची आणि मुग्धा या लागोपाठच्या वर्गात होत्या आणि हुशार होत्या. त्यामुळे शैक्षणिक विषयात आम्ही बरीच वैचारिक देवाण-घेवाण करायचो आणि तोच आमच्यातील महत्त्वाचा दुवा होता.
माझ्या कविताही त्याला आवडायच्या. मी एकदा त्याला कविता पाठवणे बंद केले, तर तो रागावला. त्याने मला फोन केला. मला म्हणाला,” तू माका कविता पाठवच्ये बंद कित्या केलंस. अरे,तुझी कविता मी हजार जणांक पाठवतंय.” त्याचं बोलणं हे असं रोखठोक असायचं.
तो अनेकांवर असं मनापासून प्रेम करायचा, मदत करायचा. त्याच्यात काही त्रुटी असतीलही, पण त्याच्या दिलदारपणाबद्दल, सच्चेपणाबद्दल कोणी शंका घेऊ शकत नाही.
अलीकडे तो आजारी होता. मी त्याला माझं एक नवीन पुस्तक भेट देण्याचा निमित्ताने त्याच्याकडे जाणार होतो. तसा त्याला फोनही केलेला. पण तो ‘येऊ नको’ म्हणाला. ‘पाठवन् दी’ असं त्याने सांगितलं. कदाचित थकलेल्या नितीनला मी भेटू नये, असं त्याला वाटलं असेल. मी दोन-तीन वेळा प्रयत्न करूनही तो मला नकोच म्हणाला. त्यामुळे मी जाणं टाळलं. आता तर तो नाहीच.
जीवनात आपण बरंच काही गमावत असतो, पण मित्र गमावण्यासारखं दुःख नाही. मी एका सच्चा मित्राला गमावलंय, हे दुःख फार मोठे आहे. नितीनच्या जाण्याने अनेकांचा आधार गेलाय, पण महत्त्वाचा म्हणजे त्याच्या कुटुंबाचा आधार गेलाय. निकिता मॅडमनी अनेक उच्च पदे भूषवलीत; पण खरा अधिकार गाजवला, तो नितीननेच. त्यामुळे त्यांनी खऱ्या अधिकाऱ्याला गमावलेय.
या शब्दांच्या बुडबुड्यांना तशी काही किंमत नसते. माणूस संपला की, समाजही पाठ फिरवतो. तरीही माझी मनापासून भावना आहे की, त्या कुटुंबाला कधीतरी माझा उपयोग व्हावा.

*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
९४०३०८८८०२

प्रतिक्रिया व्यक्त करा