*ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने केला मोठा विक्रम; अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात वाचवल्या १० धावा*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिका ४-१ ने जिंकली. त्यांनी विशाखापट्टणममध्ये दोन गडी राखून आणि तिरुवनंतपुरममध्ये ४४ धावांनी विजय मिळवला होता. यानंतर गुवाहाटीमध्ये ऑस्ट्रेलियाने पाच गडी राखून विजय मिळवला. भारताने दमदार पुनरागमन करत शेवटचे दोन सामने जिंकले. रायपूरमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी आणि आता बंगळुरूमध्ये सहा धावांनी पराभव केला.
टी-२० मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा १९व्यांदा पराभव केला आहे. एका संघाविरुद्ध भारताचा हा संयुक्त सर्वोच्च विजय आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मध्ये १९-१९ असा विजय मिळवला आहे. एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. त्यांनी २० वेळा न्यूझीलंडचा पराभव केला आहे.
भारताचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात कमी धावांच्या फरकांनी विजय :- २०२३ बंगळुरू ६ धावा, २०२० कॅनबेरा ११ धावा आणि २००७ डर्बन १५ धावा
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने २० षटकांत आठ विकेट गमावत १६० धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला २० षटकांत आठ गडी गमावून केवळ १५४ धावा करता आल्या. त्यासाठी बेन मॅकडरमॉटने सर्वाधिक ५४ धावा केल्या, मात्र तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. ट्रॅव्हिस हेडने २८ आणि मॅथ्यू वेडने २२ धावा केल्या. टीम डेव्हिड १७ धावा करून बाद झाला तर मॅथ्यू शॉर्ट १६ धावा करून बाद झाला. अॅरॉन हार्डीला केवळ सहा धावा तर जोश फिलिपला केवळ चार धावा करता आल्या. भारताकडून मुकेश कुमारने सर्वाधिक तीन बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलने एक विकेट घेतली.
अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत शेवटच्या षटकात १० धावा वाचवल्या. त्याने टीम इंडियाला सहा धावांनी विजय मिळवून दिला. अर्शदीपने २० व्या षटकात ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडला बाद करून भारताचा विजय निश्चित केला होता. त्याने पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर वेडला धावा काढू दिल्या नाहीत. तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. जेसन बेहरेनडॉर्फ चौथ्या चेंडूवर केवळ एक धाव काढू शकला. आता ऑस्ट्रेलियाला दोन चेंडूंत नऊ धावा करायच्या होत्या. पाचव्या चेंडूवर नॅथन एलिसने धाव घेतली. त्याच्यापाठोपाठ बेहरेनडॉर्फनेही शेवटच्या चेंडूवर एकच धाव घेतली. अशा प्रकारे टीम इंडियाने सहा धावांनी सामना जिंकला.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी वेडचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून यजमान संघाला सुरुवातीचे धक्के दिले. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांतच त्यांना दोन धक्के बसले. यशस्वी जैस्वाल (२१) आणि ऋतुराज गायकवाड (१०) हे दोन्ही सलामीवीर तंबूमध्ये परतले. षटकार मारण्याच्या प्रयत्नात यशस्वीला जेसन बेहरेनडॉर्फच्या चेंडूवर एलिसने झेलबाद केले. भारतीय संघाने ३३ धावांवर पहिली विकेट गमावली होती. यानंतर या मालिकेत शतक झळकावणारा ऋतुराजही बेन डॉर्सिसच्या चेंडूवर बेहरेनडॉर्फकडे झेलबाद झाला. भारताच्या दोन विकेट ३३ धावांवर पडल्या होत्या. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवही तंबूमध्ये परतला. गेल्या सामन्यातही त्याला केवळ एक धाव करता आली होती. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा खराब फॉर्म चिंतेचा विषय आहे. ४६ धावांवर भारताने तीन विकेट गमावल्या. ६.५ षटकांनंतर रिंकू मैदानात आला. आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे चर्चेत आलेल्या अलिगढच्या रिंकू सिंगला (६) या सामन्यात मोठी खेळी खेळण्याची संधी होती, पण संघाने त्याच्या संयमाची परीक्षा घेत त्याला आपल्या फिरकीत अडकवले. चौकार मारण्याच्या प्रयत्नात त्याला डेव्हिडने झेलबाद केले.
जितेश शर्माने येताच संघाच्या चेंडूवर ऑफ साइडवर शानदार चौकार मारला. त्यानंतर संघाच्याच षटकात लेग साइडला षटकार मारून धावफलक हलता ठेवला. तर, श्रेयस अय्यर दुसर्या बाजूने खराब चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवत राहिला. गेल्या सामन्यात तो ८ धावांवर बाद झाला होता. दरम्यान, हार्डीने जितेशला (२४) आपल्या जाळ्यात अडकवले आणि त्याचा झेल शॉर्टने घेतला. दोघांमध्ये २४ चेंडूत ४२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. यानंतर अय्यरने अक्षर पटेलसोबत भागीदारी केली. त्याने डावाच्या १७व्या षटकात बेनच्या चेंडूवर ऑफ साइडला चौकार मारला. अय्यर ५३ धावा करून बाद झाला तर अक्षर ३१ धावा करून बाद झाला. या दोघांनी संघाला १६० धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
नऊ विकेट घेतल्याबद्दल रवी बिश्नोईला मालिकावीर तर अक्षर पटेलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
१० डिसेंबर पासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर ३ सामन्यांच्या एकदिवसीय आणि २ कसोटीमध्ये भारतीय खेळाडूंचा कस लागणार आहे.