पंतप्रधानांच्या उपस्थितीत उद्या तारकर्ली येथे नौदल दिन साजरा होणार…
कार्यप्रणाली प्रात्यक्षिके दाखवत पराक्रम, क्षमतेचे शक्ती प्रदर्शित; सोहळ्याची तयारी पूर्ण…
मालवण
भारतीय नौदल उद्या तारकर्ली येथे नौदल दिन साजरा करत आहे. भारतीय नौदलाचा मानबिंदू असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ पहिल्यांदाच आपल्या तळापासून दूर यंदाचा नौदल दिन साजरा होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी भारतीय नौदल आपली सर्वसमावेशक कार्यप्रणाली दर्शवणारी प्रात्यक्षिके दाखवत पराक्रम आणि क्षमतेचे शक्ती प्रदर्शित करणार आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून सर्वांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे.
नौदलाचा प्रमुख कार्यक्रम तारकर्ली एमटीडीसी जवळ होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह केंद्र व राज्यातील मंत्री, वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार पंतप्रधानांचे स्वागत करणार आहेत.
राजकोट किल्ला येथे नौदलाने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी तारकर्ली येथील नौदल दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भारतीय नौदलाचे सर्वात घातक मार्कोज कमांडो तब्बल आठ हजार फुटांवरून विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर झेपावणार आहेत. यापैकी एक प्रमुख कमांडो जमिनीवर उतरल्यावर नरेंद्र मोदी यांना भारतीय नौदलाचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून प्रदान करणार आहे. यानंतर मान्यवरांची भाषणे होणार आहेत. नौदलाच्या कवायती संपल्यानंतर पंतप्रधान उपस्थितांना संबोधन करणार आहेत. भारतीय नौदल २०४७ पर्यंत आत्मनिर्भर बनण्यासाठी कटिबद्ध आहे. त्याचप्रमाणे मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड’ या नव्या संकल्पनेनुसार भारत जागतिक महासत्तेच्या दिशेने कशी वाटचाल करत आहे याबाबत मोदी आपले विचार स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या दुसऱ्या दिवशीही नौदल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने रंगीत तालीम घेण्यात आली. कार्यक्रम होणाऱ्या ठिकाणच्या सर्व रस्त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे फलक, पक्षांचे झेंडे लावण्यात आले आहेत.