आंबा काजू पिक विम्यासाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ..
ओरोस
आंबा, काजू, संत्रा ही फळपीके व रब्बी ज्वारीसाठी शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेण्यासाठी पिक विमा पोर्टल ४ व ५ डिसेंबररोजी सुरू राहणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
कोकणातील आंबा, काजू या • फळ पिकांसाठी पिक विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर असा होता. मात्र, पिक विमा पोर्टलमधील तांत्रिक समस्यांमुळे विमा योजनेत भाग घेऊ शकणारे इच्छुक शेतकऱ्यांची गैरसोय झाली होती. त्यांना भाग घेण्याची संधी देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने कृषीमंत्री धनंजय मुंडे, कृषी विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी केलेल्या विनंतीला केंद्र शासनाने मान्यता देऊन आता ४ व ५ डिसेंबर असे दोन अतिरिक्त (वाढीव) दिवस पिक विमा पोर्टल या पिकांच्या सहभागासाठी सुरू राहणार आहे. कोकण व्यतिरिक्त राज्याच्या उर्वरित भागातील आंबा उत्पादकांना विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. राज्यातील सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे