मालवण :
मालवण तारकर्ली येथे ४ डिसेंबर रोजी साजरा होणारा नौदल दिन सोहळा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा या पार्श्वभूमीवर मालवणात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून या सुरक्षा व्यवस्थेची शनिवारी सायंकाळी रंगीत तालीम घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालवणात दाखल झाले आहेत याच धर्तीवर पोलिसांनी सायंकाळी पावणे चार वाजल्यापासून पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्याच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर पोलिसांच्या गाड्यांचा ताफा नेऊन या मार्गांला जोडणारे अनेक मार्ग कश्या पद्धतीने काहीकाळ बंद राहतील ही रंगीत तालीम घेतली. पोलीस प्रशासनाने यापूर्वीच २ व ३ डिसेंबर रोजी सुरक्षा व्यवस्थेची रंगीत तालीम घेण्यात येणार असल्याची कल्पना दिलेली असल्याने नागरिकांनीही यावेळी आपल्या गाड्या थांबवून पोलीसांना सहकार्य केले.
मालवण शहरात आणि तारकर्ली मार्गावर सुरक्षा यंत्रणांकडून वाहनांचा ताफा फिरवून तालीम करण्यात आली. या ताफ्यामध्ये सर्व सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी तसेच इतरही पथके सहभागी झाली होती. पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे त्या मार्गावर ही रंगीत तालीम घेण्यात आली.