You are currently viewing उबाठा सेने पाठोपाठ भाजपची ‘बनवाबनवी ; मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांचा आरोप.

उबाठा सेने पाठोपाठ भाजपची ‘बनवाबनवी ; मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांचा आरोप.

उबाठा सेने पाठोपाठ भाजपची ‘बनवाबनवी ; मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांचा आरोप.

मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसेचे अमित इब्रामपूरकर यांनी सत्ताधारी भाजप व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. सुमारे ४.१० कोटींचा प्रस्ताव सादर केलेला असून लवकरच निधी मंजूर होऊन नाट्यगृहाच्या कामाला चालना मिळणार असल्याचे सहा महिन्यापूर्वी भाजपच्या मंडळींनी संगितले होते पण आज डिसेंबर महिना उजाडला तरी निधी मंजूर होवू शकला नाही. मनसे नेते परशुराम उपरकर यांनी मालवण पालिकेकडून घेतलेल्या माहितीच्या अधिकारात ही बाब उघड झाली आहे. यावरून उबाठा सेने पाठोपाठ भाजपचे लोक ‘बनवाबनवी’ करत असल्याचा आरोप मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे.

मालवणच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा असलेल्या येथील मामा वरेरकर नाट्यगृहाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे अनेकदा येथे येणाऱ्या कलाकार आणि नाट्य रसिकांची गैरसोय होते. या नाट्यगृहाची डागडुजी करण्यासाठी अनेकदा कलाकारांकडून मागणी करण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत या नाट्यगृहाच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र आता मामा वरेरकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाला चालना मिळण्याची शक्यता आहे.नाट्यगृहाच्या संपूर्ण नूतनीकरणासाठी सुमारे ४.१० कोटींच्या खर्चाचे अंदाजपत्रक बनवण्यात आले असून या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाला निधी मिळण्यासाठी भाजपा नेते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा आमदार नितेश राणे, आ. कालिदास कोळंबकर यांचे लक्ष वेधले होते.मा.नारायण राणे यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे लेखी पत्राद्वारे लक्ष वेधले होते. तर आ. कालिदास कोळंबकर यांनी विधानभवनात ना. मुनगंटीवारांशी चर्चा करून मामा वरेरकर नाट्यगृहाला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

मालवण नगरपालिकेच्या वतीने सन २००६ मध्ये सिंधुदुर्गातील पहिले सुसज्ज असे नाट्यगृह उभारण्यात आले आहे. आज जवळपास १७ वर्षे उलटली तरी या नाट्यगृहाची डागडुजी करण्यात आली नाही. पावसाळ्यात या नाट्यगृहाला गळती लागत असून आतील खुर्च्या आणि पंख्याची मोडतोड झाली आहे.माईक सिस्टिम सुद्धा बाहेरून आणावी लागत आहे.त्यामुळे अनेकदा येथे नाट्य प्रयोगासाठी येणाऱ्या कलाकारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते.पालिकेच्या वतीने येथे नवीन इमारत उभी करण्यात आली. पण नाट्यगृहाच्या मूळ इमारतीकडे दुर्लक्ष करण्यात आले.

मालवणच्या जनतेला मुर्ख समजण्याचे काम दोनही पक्ष ‘उबाठा’सेना व भाजप पद्धतशिरपणे करत आहेत का ?असा जळजळीत सवालही इब्रामपूरकर यांनी केला आहे.शहराच्या विकासाकडे सर्वच पक्षांनी पाठ फिरवली आहे का ?एकीकडे नौसेना दिनाच्या पार्श्भूमीवर मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे निकृष्ट करण्याचे पाप सत्ताधारी भाजपची मंडळी करत आहेत.झालेले रस्ते किती काळ टिकणार याबाबतही साशंकता आहे. तर दुसरीकडे आमच्या आमदार खासदार मंत्र्यांकडून निधी मिळणार मालवणचा विकास होणार अशी बोंबाबोंब भाजपचे लोक करत आहेत. जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधींना शासन स्तरावर मंत्री अधिकारी जुमानत नसल्याचे स्पष्ट होत आहे असा आरोप अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा