एका दिवसासाठी देशभरातील संपूर्ण टोल नाके मोफत करून; भाजपच्या मंत्र्यांचाही निषेध, घेराव करणार…
केंद्र सरकारने मोठमोठ्या उद्योगपतींचा फायदा करण्यासाठी तीन कृषी कायदे कॉर्पोरेट्ससाठी लागू केले आहेत. मात्र, आंदोलक शेतकऱ्यांनी ‘आता जियो सिमपासून रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत. तसेच उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या पेट्रोलपंपावरही बहिष्कार टाकू. त्यांच्या पेट्रोलपंपवरुन पेट्रोल घेणार नाही”, असा बेधडक इशारा दिला आहे.
कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांना केंद्र सरकारने आज प्रस्ताव पाठवला होता. परंतु शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळला असून याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी त्यांनी ‘आता शेतकरी आंदोलनाला आणखी आक्रमक रुप येणार असून, दिल्लीला लागणाऱ्या सर्व राज्यांच्या सीमांना सील करु,’ असा देखील इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी अंबानी-अडाणी यांच्या पेट्रोलपंपांवर पेट्रोल खरेदी करणार नाही, अशी भूमिका मांडली.
“केंद्र सरकार मोठमोठ्या कंपन्यांच्या फायद्यासाठी कृषी कायदे मागे घेण्यास तयार नाही. त्यामुळे आम्ही या कंपन्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे”, असं आंदोलक शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.
“देशभरातील सर्व शेतकरी 14 डिसेंबरला केंद्र सरकारविरोधात धरणे आंदोलन करून आणखी तीव्र केलं जाईल. भाजप नेत्यांचाही निषेध केला जाईल. पण आंदोलन संपणार नाही, आम्ही सर्व एकत्र आहोत. त्यामुळे आमच्या एकजुटीला कुणीच तोडू शकत नाही”, असंही आंदोलक शेतकरी म्हणाले.
मंगळवारी 8 डिसेंबर ला शेतकऱ्यांनी देशभरात भारत बंदचा नारा दिला होता. संपूर्ण देशभरात भारत बंदला जवळपास सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत आंदोलक शेतकऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर बुधवारी पुन्हा शेतकऱ्यांसोबत बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी ही बैठक स्थगित करण्यात आली. त्यानंतर सरकारकडून शेतकऱ्यांना प्रस्ताव पाठवण्यात आला. या प्रस्तावावर शेतकऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रस्ताव मान्य नसल्याचं स्पष्ट केलं.
दिल्ली बॉर्डरवर आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांनी सरकारचे प्रस्ताव फेटाळून लावले आहेत. 12 तारखेला दिल्ली-जयपूर, दिल्ली-आग्रा महामार्ग बंद करण्याचा तसंच 14 रोजी संपूर्ण देशात ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार करून निदर्शनं करण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे. रस्ते किंवा रेल्वे बंद करण्याचा आमचा विचार नव्हता, पण आता आम्ही दिल्ली-जयपूर महामार्ग बंद करण्याच निर्णय घेतला आहे.