You are currently viewing कोरोना योद्ध्यावरच ओढवलं कोरोनामुळे संकट.

कोरोना योद्ध्यावरच ओढवलं कोरोनामुळे संकट.

कोरोनाचे संकट सुरू झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोक कोरोना या रोगाला घाबरले होते. सुरुवातीस सिंधुदुर्गात कोरोनाचा रुग्ण नव्हता परंतु जेव्हापासून जिल्ह्यात रुग्ण वाढू लागले तेव्हापासून कोरोनाचा प्रसार तत्काळ होतो, त्यातून मृत्यू ओढवतो अशा भीतीपोटी अनेकांनी स्वतःच्या घरच्या व्यक्तीचा मृत्यू देखील कोरोनाने झाला तरी मृतदेह घरी न नेता, किंबहुना ताब्यातही न घेता बाहेरच्या बाहेरच अग्नी दिले. काहींनी तर अग्नी देण्यासाठी सुद्धा इतर पर्यायांचा विचार केला. अशावेळी “कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार घरच्याही नाही केले तर ते आपण करणार” असे सांगत स्वतःला समाजाच्या सेवेत वाहून घेण्याचे शिवधनुष्य लीलया पेलले व गेल्या आठ नऊ महिन्यात जवळपास पन्नास लोकांचे अंत्यसंस्कार केले ते इन्सुली, (ता.सावंतवाडी) हेमंत वागळे यांनी.!
ऐन कोरोनाच्या काळात अनेक कुटुंबातील कोरोनामुळे मृत झालेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या हेमंत वागळे यांच्यावर स्वतःच्या वडिलांना देखील कोरोनामुळे मृत झाल्याने अग्नी देण्याची वेळ आली आणि आपल्यावर अचानकपणे कोसळलेल्या संकटामुळे कोरोना काळात इतरांना आधार देणारा हा आधारवड मात्र स्वतःच हालला. चराठे येथील शाळेतून शिक्षकी पैशातून निवृत्त झालेले शिक्षक व हेमंत यांचे वडील सत्यवान वागळे यांचे कोविडच्या आजाराने काल दुपारी निधन झाले. आपल्या वडिलांनी दिलेला समाजसेवेचा वसा या पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार करून पुन्हा एकदा आपण समाजाच्या सेवेत वाहून घेणार असा विश्वास हेमंत वागळे यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाच्या काळात अनेकांना दिलेला मदतीचा हात आणि त्या कुटुंबीयांनी दिलेले आशीर्वाद त्यांना भविष्यातील प्रवासात नक्कीच मदत करतील यात शंकाच नाही.
कोरोना आटोक्यात आला, काही प्रमाणात प्रवास, बाजारपेठा इत्यादी सुरू झाल्याने आणि कोरोनाचे संकट जिल्ह्यावरून दूर होत असल्याची जाणीव झाल्याने हेमंत यांच्या वडिलांनी आपल्याला अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेण्याची इच्छा बोलून दाखविली. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हेमंत यांनी आपल्या कुटुंबियांना घेऊन स्वामींचे दर्शन घेऊन आले. परंतु अक्कलकोट वारीवरून आल्यावर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या वडिलांना ताप येण्यास सुरुवात झाली आणि कोविडच्या टेस्टमध्ये ते पॉझिटिव्ह आले. कोविडचे उपचार सुरू असतानाच मात्र हेमंत यांच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या अचानक जाण्यामुळे व्यथित झालेल्या हेमंत यांनी आपण पन्नासापेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केलेले असताना बावन्नवा मृतदेह आपल्याच वडिलांचा असेल असे आपल्याला स्वप्नातही वाटले नव्हते अशी खंत व्यक्त केली. आपल्या नशिबात जे आहे त्याचा स्वीकार करून वडिलांनी आपल्याला दिलेला समाजकार्याचा वसा भविष्यातही सुरू ठेवणार असा निर्धारच हेमंत वागळे यांनी केला आहे. या सर्व घडामोडींमध्ये दुःखाला वाट करून देतानाच आपण आपल्या वडिलांची स्वामींचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण केल्याचे समाधान वाटल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली.
समाजाच्या कठीण प्रसंगात समाजातील गरजवंतांना मदत करताना आपल्या जीवाची पर्वा न करता, कधीही वेळ काळ न बघता धावून जाणारा खरा कोविड योद्धा आपल्या स्वतःच्या घरावर आलेल्या कोविडच्या संकटातून पुन्हा एकदा उभा राहत कोविड योद्धा कसा असावा याचा आदर्श निर्माण केला आहे तो हेमंत वागळे या तरुण युवकाने….!

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − nine =