You are currently viewing डॉ. डी. बी. खानोलकर रुग्णसेवा केंद्राच्या विस्तारित कक्षाचे उद्घाटन

डॉ. डी. बी. खानोलकर रुग्णसेवा केंद्राच्या विस्तारित कक्षाचे उद्घाटन

जेष्ठ बालरोग तज्ञ डॉ अरविंद खानोलकर यांच्या हस्ते उद्घाटन..

 

सावंतवाडी:

 

सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या “डॉ डॉ. डी. बी. खानोलकर रुग्णसेवा केंद्राच्या विस्तारित कक्षाचे उद्द्घाटन सावंतवाडी येथील प्रसिध्द जेष्ठ बालरोग तज्ञ डॉ अरविंद खानोलकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.

जिल्ह्यातील गरजू रुग्णांची गरज लक्षात घेऊन सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी शहरातील सबनीसवाड्यात एकमुखी दत्त मंदिराजवळ सुनील उकीडवे यांच्या सुशिला अपार्टमेंटमध्ये पाच वर्षांपूर्वी रूग्ण सेवा सुरू केले. हे रूग्ण सेवा केंद्र गरजूंना सेवा देत असुन केंद्राच्या सेवेचा लाभ जिल्ह्यासह गोव्यातील हजारो गरजू घेत आहेत. या रुग्ण सेवा केंद्राचा वाढता व्याप लक्षात घेऊन सिंधुमित्र प्रतिष्ठानने सावंतवाडी येथील श्री बी. एस. बांदेकर फाईन आर्टस् कॉलेज कंपाऊंडमध्ये बांदेकर कुटुंबीयांच्या सहकार्याने या रुग्णसेवा केंद्राचा हा विस्तारित कक्ष सुरू करण्यात आला आहे.

यावेळी बालरोगतज्ञ डॉ मिलिंद खानोलकर, स्त्री रोग तज्ञ डॉ राजेश नवांगुळ, डॉ धीरज सावंत, अस्थिरोगतज्ञ डॉ कश्यप देशपांडे, बालरोगतज्ञ डॉ दत्तात्रय सावंत, डॉ गोविंद जाधव, डॉ संजय दळवी, डॉ आत्माराम बागलकर, उद्योजक शैलेश पई, सुनिल उकिडवे, रमेश भाट, हेमंत खानोलकर, माधव परब, उमेश परब, रामचंद्र सावंत, नितीन गोंडगिरे, भास्कर साधले, सागर रेडकर, सदानंद रेडकर, सौ वैशाली संगमनेरकर, अविनाश धर्मा, गीता बांदेकर, रश्मी बांदेकर, राम बांदेकर, उमेश सावंत,डॉ प्रविणकुमार ठाकरे, डॉ विशाल पाटील, डॉ मुग्धा ठाकरे, सि ए लक्ष्मण नाईक, प्रशांत कवठणकर, भार्गवराम शिरोडकर, केदार बांदेकर, आनंद मेस्त्री, अँड्र्यू फर्नांडिस, असिफ शेख, अनघा शिरोडकर, गुरूनाथ राऊळ, श्रीकांत दळवी, दीपक गावकर, रवी जाधव, सिद्देश मणेरीकर आदी सिंधु मित्र उपस्थित होते.

गंभीर अपघातात फ्रॅक्चर झाल्यानंतर, पॅरालाईस ॲटक नंतर अथवा वृद्धापकाळात रुग्ण अंथरुणाला खिळलेला असतो. अशावेळी त्यांना फाऊलर बेड, व्हील चेअर, कमोड चेअर, वॉकर, कमोड चेअर (चाकासाहित), नेब्युलाईझर अश्या अनेक वैद्यकिय साहित्याची काही कालावधीसाठी गरज असते. मात्र आधीच या रुग्णावर झालेला खर्च कुटुंबाला असह्य असतो. त्यामुळे रुग्ण घरी आल्यानंतर त्याला रुग्णालयासारख्या किमान सुविधा घरीच उपलब्ध व्हाव्यात आणि कुटुंबियांना रुग्णाची सेवासुश्रुषा करणे सोपे व्हावे या उद्देशाने ‘वापरा व परत करा’ या तत्वावर सिंधुमित्रसेवा सहयोग प्रतिष्ठानचे हे रुग्णसेवा केंद्र आपली सेवा देत आहे. २०१८ पासून सुरु असलेल्या केंद्राच्या उपलब्ध सेवेचा लाभ जिल्ह्यासह गोव्यातील शेकडो गरजू घेत आहेत.

सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा येथील एकमुखी दत्त मंदिराजवळ उकीडवे यांच्या सुशिला अपार्टमेंटमध्ये हे रूग्ण सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. २०१८ पासून गेली पाच वर्षे हे रूग्ण सेवा केंद्र गरजूंना सेवा देत आहे. यासाठी सुनील उकीडवे यांच्यासह या इमारतीमधील सर्व रहिवाश्यांचे सहकार्य लाभते.

आपल्या जिल्हयातील अनेकजण नोकरी व व्यवसायानिमित्त देश विदेशात आहेत. त्यात आपल्या जिल्हयातील अनेक जवान सिमेवर देशाच्या रक्षणासाठी कार्यरत आहेत. हे सर्वदूर असताना त्यांच्या निकटवर्तीयाचे जेव्हा दुःखद निधन होते, तेव्हा त्यांना किमान अंत्यदर्शनाची ओढ लागलेली असते! मात्र अंत्यसंस्कारासाठी भौगोलिक दृष्ट्या अंतर व दळणवळणाच्या दृष्टीने त्यांना तात्काळ गावी येणे अडचणीचे ठरत असल्याने ते अंत्य विधीसाठी उपस्थित राहू शकत नाही. ही सल आयुष्यभर त्यांच्या मनात राहते. याचेच सामाजिक भान ठेवत सिंधुमित्र प्रतिष्ठानने या रुग्णसेवा केंद्रात ‘शितशवपेटी’ अर्थात डेड बॉडी फ्रीझर गरजूंसाठी मोफत उपलब्ध केला आले. या सुविधेचा अनेकजण लाभ घेत आहेत.

सावंतवाडी येथील कै डॉ डी बी खानोलकर यांनी आपल्या कुटुंबासह व्यक्तिगत जिवन जगताना आयुष्यभर बांदा येथे बांदा व परिसरातील रुग्णांची समाजभावनेतुन सेवा केली. रोजच्या उत्पन्नाचे ते तीन भाग करत. एक भाग क्लिनिकच्या खर्चासाठी, एक भाग स्वतःच्या संसारासाठी व एक भाग समाजासाठी. या निःस्वार्थी समाजसेवकाचे कार्य चिरंतर राहण्यासाठी तसेच आजच्या पिढीसमोर त्यांचा आदर्श राहण्यासाठीच या रुग्ण सेवा केंद्राला कै डॉ डी बी खानोलकर रुग्ण सेवा केंद्र हे नाव देण्यात आले.

या रुग्णसेवा केंद्राची जबाबदारी सिंधुमित्र प्रतिष्ठानने आनंद मेस्त्री, अँड्र्यू फर्नांडिस व केदार बांदेकर या तिघांवर दिली असुन सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून ते गरजूंना सेवा देत आहेत. गरजूंना जेव्हा दिवसा व रात्री या केंद्रातील साहित्याची गरज असते, तेव्हा सिंधुमित्र प्रतिष्ठानचे हे कार्यकर्ते निःस्वार्थ भावनेने या केंद्राची सेवा देण्यासाठी तत्पर असतात. आनंद मेस्त्री हे व्यवसायाने रिक्षाचालक, अँड्र्यू फर्नांडिस हे सुतार आहेत तर केदार बांदेकरांचा शेतकी व्यवसाय आहे. हे तिघेही कार्यकर्ते यासाठी आपला वेळ देतातच शिवाय गरजुंच्या एका कॉलवर आपले काम सोडुन तत्पर सेवा देतात.

अपघातात गंभीर जखमी होऊन घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांची देखील सेवा घडावी, या उद्देशाने “डॉ डी बी खानोलकर रुग्ण सेवा केंद्र” सुरू केले आहे. आतापर्यंत शेकडो रुग्णांनी याचा लाभ घेतलाच शिवाय या केंद्रात उपलब्ध असलेली ‘शितशव पेटी’ शेकडो गरजूंना उपयोगी ठरली आहे. आमच्या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या केंद्राचे सेवेकरी आनंद मेस्त्री, अँड्र्यू फर्नांडिस, केदार बांदेकर अहोरात्र सेवा देत आहेत. याचा आम्हाला अभिमान असुन भविष्यातही आमचे प्रतिष्ठान ही सेवा जास्तीतजास्त गरजूंना देणार आहे. त्यामुळे या केंद्राचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे यांनी केले आहे.

*दात्याना आवाहन*

गरजूंची संख्या वाढत असल्यामुळे पर्यायाने साहित्य उपलब्ध नसल्यामुळे काही वेळा गरजूंना आम्ही साहित्य देऊ शकत नाही, याची आम्हाला खंत वाटते. समाजाच्या मदतीवरच हे रुग्णसेवा केंद्र चालते. त्यामुळे दात्यांनी पुढे येऊन केंद्राला फाऊलर बेड, व्हील चेअर, वॉकर आदी साहित्याची मदत केल्यास सर्व गरजूंना या केंद्राची सेवा मिळणार असल्याचे अँड्र्यु फर्नांडिस आनंद मेस्त्री केदार बांदेकर यानी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − eleven =