उरण – रायगड जिल्हा:-
उरण तालुक्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक दृष्टया महत्वाचे असलेले शिवकालीन द्रोणागिरी किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने गड किल्ले संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून दुर्गसंवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुर्गसंवर्धन मोहिमे अंतर्गत गड किल्ले परिसरात साफसफाई करण्यात आली तसेच सदर द्रोणागिरी किल्ल्याचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने व्यापक चर्चा करण्यात आली.गेली 8, 9 वर्ष्याहून जास्त वर्षांपासून सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत या द्रोणागिरी किल्ल्यावर अनेक मोहिमा आखल्या गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गड किल्य्यांचे महाराष्ट्र्भर संघटनेच्या माध्यमातून संवर्धन व संरक्षण करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठानने विविध मोहिमेच्या माध्यमातून द्रोणागिरी किल्ल्याची दुरावस्था सर्वप्रथम जनतेसमोर आणली. उरण मधील नागरिकांनाही हा किल्ला माहित नव्हता मात्र विविध उपक्रम व जनजागृती करून सह्याद्री प्रतिष्ठानने किल्ल्याचा खरा इतिहास व समस्या सर्वप्रथम जनतेसमोर उजेडात आणल्या. सह्याद्री प्रतिष्ठानमुळे उरणकरांना द्रोणागिरी किल्ल्याची माहिती झाली व ही माहिती सर्वदूर पसरली. त्यानंतर दुर्ग मावळा प्रतिष्ठाननेही अनेक मोहिमा या किल्ल्यावर आखले असून अनेक तलाव, हौद, टाके, इतिहासकालीन वस्तू यांचा शोध लावला आहे. विविध पुरातन वस्तू, अवशेष, इतिहासकालीन तलाव, टाके आदींचा शोध हे दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे महत्वपूर्ण काम आहे त्याच बरोबर नियमितपणे साफसफाई तसेच किल्ले संवर्धनाचे काम दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते निरपेक्ष भावनेने करत आहेत. नेहमीप्रमाणे याही वेळी युवकांचा मोहिमेत उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला. सह्याद्री प्रतिष्ठान व दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या विविध मोहिमामुळे द्रोणागिरी किल्ल्याचे खऱ्या अर्थाने संरक्षण व संवर्धन होत असल्याने इतिहासप्रेमी, विविध सामाजिक संस्था, शिवप्रेमी कडून सह्याद्री प्रतिष्ठान व दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या निरपेक्ष कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.