मळगाव पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधींची निवेदनाद्वारे मागणी
सावंतवाडी :
सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस, मंगलोर एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस आणि नागपूर, मडगाव एक्सप्रेस या गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी मळगाव पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधींनी केली आहे. दरम्यान येथील रेल्वे स्टेशन समस्यांच्या गर्तेत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना अनेक गैरसोईंना सामोरे जावे लागत आहे. याबाबत प्रवाशांची नाराजी लक्षात घेता तात्काळ योग्य तो निर्णय घेऊन समस्या दुर करा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला. याबाबतचे निवेदन मळगाव, निरवडे, वेत्ये, होडावडे गावातील सरपंच उपसरपंचासह ग्रामस्थांनी स्टेशन मास्तर प्रतीक्षा गावकर यांच्याकडे दिले आहे. याबाबत आवश्यक तो पाठपुरावा वरिष्ठ स्तरावर करण्यात येईल, असे आश्वासन सौ. गावकर यांनी यावेळी दिले.
यावेळी निरवडे सरपंच सुहानी गावडे, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर, भूषण बांदिवडेकर, प्रकाश जाधव, सागर तळवडेकर, एकनाथ जाधव, काका पांढरे, बबन आसोलकर, साई गावडे, गौरव माळकर, सिताराम गावडे आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सावंतवाडी रेल्वे स्थानक हे सिंधुदुर्गातील एक महत्वाचे स्थानक आहे. आणि येथे दिवसाकाठी शेकडो प्रवासी प्रवास करतात. परंतु अपेक्षित प्रवासी संख्या आणि उत्पन्न या स्थानकाचे असून देखील येथे प्रवासी सुविधांचा अभाव आहे. तर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे. टर्मिनस फेज १ च काम जवळपास पूर्ण झाले असून फेज २ चे काम पूर्णतः बंद आहे. त्या कामाला विलंब झालेला असून ८.१४ कोटींचा निधी मागे गेला होता तो पुन्हा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा स्थानिक लोकप्रतिनिधी मार्फत अधिकचा निधी मंजूर करण्यात यावा. केंद्र सरकारच्या अमृत भारत स्थानक योजनेत सावंतवाडी स्थानकाचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा करणे. पीआरएस सुविधा पूर्णवेळ उपलब्ध करून देणे. सरकत्या जिन्यासहीत प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ३ ला जोडणारे एफओबीला पूर्ण शेड टाकणे. सावंतवाडी ते वसई (मुंबई) रोज नवीन एक्स्प्रेस ट्रेन सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत. सावंतवाडी- कल्याण जंक्शन (मुंबई)- पुणे ही दररोज धावणारी नवीन एक्स्प्रेस ट्रेन सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत. पेडणे, मडगाव, कारवार, मेमू ट्रेनचा विस्तार सावंतवाडी पर्यंत करावे, सध्या पेडणे कारवार मेमू ट्रेन झेडबीटीटी मुळे रद्द आहे परंतु मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मोपा (पेडणे) भविष्यात प्रवाशांची संख्या वाढेल आणि या मेमू ट्रेनचा वापर प्रवाशांच्या सोयीसाठी देखील केला जाईल.
प्रवाशांच्या सोयीसाठी फलाट क्रमांक १, २ व ३ वर शेड उभारणे. बेळगाव ते सावंतवाडी ह्या नवीन ब्रॉड गेज मार्गासाठी प्रयत्न करावेत. सावंतवाडी स्थानकावर १२१३३/३४ मंगलोर एक्सप्रेस, २२२२५/३० बंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळावा. तसेच कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या राजधानी एक्सप्रेस, गरीबरथ एक्सप्रेस आणि नागपूर मडगाव एक्सप्रेसचा थांबा पूर्ववत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.