You are currently viewing चाफेखोल सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपच्या रविना घाडीगांवकर विजयी

चाफेखोल सरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपच्या रविना घाडीगांवकर विजयी

मालवण:

 

मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायती ची सार्वत्रिक निवडणूक आणि चाफेखोल ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे यश आहे. आचरा निवडणुकीत विरोधकांनी भाजपा समोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला होता. काही किचकट मुद्दे प्रचारात आणण्यात आले. पण आमचे कार्यकर्ते युद्धा सारखे लढले आणि त्यांनी येथे विजय खेचून आणला. चाफेखोल ग्रा. पं. सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या रविना घाडीगांवकर ह्या विजयी झाल्या आहेत. या दोन्ही गावातील विकास कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिली आहे.

भाजपा तालुका कार्यालयात ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, राजेंद्र प्रभुदेसाई, विकी तोरसकर, प्रमोद करलकर, आप्पा लुडबे, दयानंद देसाई, राजू परुळेकर, संतोष गावकर, शेखर कांबळी, निलेश खोत, विजय ढोलम यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्री. चिंदरकर म्हणाले, भाजपच्या विजयाची आजपासून सुरुवात आहे. यानंतरच्या कोणत्याही निवडणुकीत भाजपचा कार्यकर्ता हार मानणार नाही. आमदार वैभव नाईक हे आचरा गावात ठाण मांडून असतानाही जनतेने त्यांना नाकारले आहे, असे ते म्हणाले.

चाफेखोल ग्रा. पं. मध्ये रविना घाडीगांवकर ह्या विजयी झाल्या आहेत. त्या दोनवेळा भाजपच्या तिकिटावर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या असून आताही त्या भाजपच्या विद्यमान ग्रा. पं. सदस्य आहेत. असे असताना शिवसेनेचे कुडाळ मालवण क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांनी काल रविना घाडीगांवकर ह्या शिवसेना उमेदवार असल्याचे चुकीचे वक्तव्य केले आहे. तालुक्यात भाजपा आणि शिवसेना एकसंघ पणे काम करत असताना अशी चुकीची वक्तव्ये टाळली जावीत असे सांगून आचरा निवडणुकीतही शिवसेनेने असेच प्रकार केले होते, असे श्री. चिंदरकर म्हणाले.

मी भाजपाची उमेदवार : चाफेखोल सरपंच

चाफेखोल ग्रा. प. सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत रविना घाडीगांवकर यांनी विजय मिळवला आहे. येथे रविना घाडीगांवकर यांना १५४ तर मयुरी घाडीगांवकर यांना ११५ मते मिळाली. रविना घाडीगांवकर ह्या शिवसेनेच्या उमेदवार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आपण भाजपाच्याच उमेदवार असून शिवसेनेने मला पाठींबा दिला होता, असे स्पष्ट करून आपल्या विजयासाठी परिश्रम करणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा