सावंतवाडी :
पाडलोस येथील शेतकरी विश्वनाथ नाईक यांच्या शेतात तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आज पारंपरिक पद्धतीने भात कापणीत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मनुष्यबळाचा वाढता अभाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेती करताना आधुनिक पद्धत वापरावी जेणेकरून त्याचा फायदा होईल, असे आवाहन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आज येथे केले. दरम्यान जुन्या बियाण्याबरोबर नवीन संकरित बियाण्यांची लागवड करण्याकडे भर द्यावा, संकरित भाताचा तांदूळ बाजारात जास्त दराने विकला जातो. त्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असेही त्यांनी सांगितले.
त्यांच्या समवेत शेतकरी विश्वनाथ नाईक, छाया नाईक, पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर, उपसरपंच राजू शेटकर, रोणापाल पोलीस पाटील निर्जरा परब, ग्रामपंचायत सदस्य काका परब, शिवसेना इन्सुली विभागप्रमुख राजन परब, पाडलोस तंटामुक्ती समिती अध्यक्ष मधुकर परब तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
तहसीलदार श्रीधर पाटील म्हणाले की, गावातील प्रत्येक नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढले पाहिजे. त्याचा उपयोग भविष्यात होऊ शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुधाला उच्च दर्जा असल्यामुळे जास्त मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायातही उतरावे. आपण लावलेले भात पीक आज परिपक्व झाल्याने आणि कापणीसाठी मिळाल्याने समाधान वाटते. प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्याअखत्यारीत गावात जाऊन शेतकऱ्यासोबत वावरल्यास त्यांच्या समस्या अडचणी समजू शकतात असे श्री पाटील यांनी सांगितले.
उपसरपंच राजू शेटकर म्हणाले की, पाडलोस परिसरात वन्यप्राणी नुकसान करतात, त्या बदल्यात अल्प प्रमाणात तुटपुंजी नुकसान भरपाई मिळते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या अनेक असून त्या समजण्यासाठी गावात कार्यरत असलेल्या ग्रामसेवक, कृषीसेवक, वनरक्षक अशा प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी गावात किमान दोन गुंठे शेती बागायती करावी ज्यामुळे शेतकऱ्याचे दुखणे काय असते ते अनुभवता येईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
तहसीलदार श्री. पाटील सामान्य शेतकरी कुटुंबात मिसळल्याने आज प्रशासन खरोखर सामान्य जनतेसाठी कार्य करत असल्याचे दिसून आले. अशीच सामान्य जनते प्रति सहकार्याची भावना प्रत्येक सरकारी कर्मचारी, अधिकारी यांनी ठेवल्यास आमच्यासारख्या गाव पुढाऱ्यांची गरजच पडणार नाही, लोक स्वतःची कामे स्वतः करू शकतील असे पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर यांनी सांगितले. दरम्यान, स्वतःच्या हाताने लागवड केलेले भात पीक स्वतःच्या हातांनी कापण्यासाठी आवर्जून पाडलोस केणीवाडा मध्ये आल्याबद्दल शेतकरी विश्वनाथ नाईक यांनी तहसीलदारांचे आभार मानले.