युरेका सायन्सच्या मुलांनी बनविले सुगंधी उटणे
कणकवली
दिवाळीनिमित्त युरेका सायन्स सेंटरच्या मुलांनी नैसर्गिक सुगंधी उटण्याची २००० पाकिटे बनविली आहेत. विशेष म्हणजे पर्यावरण जागृतीसाठी या उटण्याच्या पॅकिंगमध्ये प्लास्टिकचा वापर न
करता कागदच वापरण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना सणांची सात्विक ओळख व्हावी, त्यांची उपक्रमशीलता, संवाद कौशल्य, विक्रीतंत्र आत्मविश्वास वाढावा, स्वकमाईतला आनंद व आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण व्हावा, या हेतूने हा उपक्रम युरेकातर्फे राबविण्यात येतो. गेली दहा वर्ष युरेका सायन्स सेंटरची मुले दिवाळी सणासाठी नैसर्गिक सुगंधी उटणे बनवत आहेत. पाकिटात विविध बिया वापरल्या असून हे पाकीट फेकून दिल्यानंतर त्यातून झाडे उगवतील. बच्चेमंडळींनी ही पाकिटे घरोघरी जाऊन विकण्यास सुरुवातही केली आहे. यावर्षी फक्त सिंधुदुर्गातच नव्हे तर मुंबई, पुणे या ठिकाणीही या पाकिटांची विक्री सुरू आहे. मुलांच्या या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे.