*आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे आयोजन*
वेंगुर्ला :
साईमंगल कार्यालयाच्या सभागृहात आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे चांदणझुला हे कवीसंमेलन ह.भ.प.कीर्तनकार अवधूत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात आणि रसिकांच्या गर्दीत पार पडले.
कवीसंमेलनाचे उद्घाटक म्हणून सावंतवाडीतील निवृत्त प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष गोवेकर होते. व्यासपीठावर प्रा. आनंद बांदेकर, लेखिका स्नेहल फणसळकर, निवृत्त प्रबंधक चारूता दळवी, सौ. वृंदा कांबळी इत्यादी मान्यवर ऊपस्थित होते. कवीसंमेलनात अजित राऊळ, विशाल उगवेकर, संकेत येरागी, सत्यम गडेकर, प्रितम ओगले, स्वप्निल वेंगुर्लेकर, राजश्री परब, आदिती मसूरकर, जान्हवी कांबळी, स्नेहल फणसळकर, हेमा सावंत, योगीश कुळकर्णी, स्नेहा नारिंगणेकर, सुरेखा देशपांडे, मुक्ता केळकर, आदित्य खानोलकर, सोमा गावडे, प्रदीप केळुसकर, माधव ओगले इत्यादिनी आपापल्या कविता सादर केल्या.
कवीसंमेलनात प्रत्येकवेळी दोन कविना विशेष संधी देण्याच्या आनंदयात्रीच्या निर्णयाप्रमाणे शिरोडा येथील कवी स्वप्निल वेंगुर्लेकर व दाभोली येथील कवयित्री प्रितम ओगले यानी यावेळी आपल्या विशेष रचना सादर केल्या. स्वप्निल वेंगुर्लेकर यानी आपल्या विविध विषयावरील सहा कविता आकर्षक अशा निवेदनाच्या सूत्रात गुंफून सुंदर रितीने सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. तसेच प्रितम ओगले यानीही आपल्या चार रचना गाऊन व वाचून सादर केल्या.
कवीसंमेलनाचे ओघवते व समयोचित असे निवेदन करून निवेदनाची बाजू प्रितम ओगले यानी चांगली सांभाळली. कवीसंमेलन उत्तरोत्तर रंगतच गेले. रसिकाना खिळवून ठेवणारे असे हे कवीसंमेलन संस्मरणीय झाले. अशी कवी संमेलने वरचेवर आनंदयात्रीने आयोजित करून रसिकाना काव्यानंद द्यावा अशा प्रतिक्रिया रसिकांमधून व्यक्त होत होत्या. वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा, आरवली, दाभोली, वायंगणी, कोचरा, इत्यादी ग्रामीण भागातून काव्यरसिकांची असलेली उपस्थिती आयोजकाना उत्साहवर्धक होती.
उद्घाटन सत्रात प्रा.सुभाष गोवेकर, अवधूत नाईक यांचा , प्रा.आनंद बांदेकर यांचा निवृत्तीपूर्वी दोन दिवस आधी पूर्व संध्येला सपत्निक, माणगाव येथील स्नेहल फणसळकर यांच्या कथा संग्रहाला को.म.सा.प.चा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, चारूता दळवी या प्रबंधकपदावरून निवृत्त झाल्याबद्दल सर्वांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कवी संमेलनाचे अध्यक्ष अवधूत नाईक यानी कोणत्याही क्षेत्रातील प्रगतीसाठी गुरूची आवश्यकता असते असे सांगून गुरूचे वर्णन करणारे पद सादर करून रसिकाना प्रभावित केले.
साहित्य कोणतेही असो, कथा कविता ,कादंबरी ते समाजहिताचा विचार करूनच लिहिलेले असावे. त्यात उदबोधनही असावे. सामाजिक विचाराना कवितेत महत्त्व असावे असे विचार प्रा.गोवेकर यानी मांडले.
प्रास्ताविक प्रा. सचिन गोवेकर यानी व आभार सर्पमित्र महेश राऊळ यानी मानले. रसिकांची उपस्थिती व शेवटपर्यंत बसून काव्याचा आस्वाद घेणे यानी हे कवीसंमेलन संस्मरणीय झाले. वेंगुर्ल्यात कोजागिरीच्या दिवसाची संध्याकाळ अशी काव्यमय रंगली.