नवी मुंबई (सुचित्रा कुंचमवार) :
महाराष्ट्र आर्य वैश्य समाज, बोंगिरवार भवन सानपाडा, नवी मुंबई इथे दि.२९ ऑक्टोबर २०२३ रोजी भरत यमसनवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सप्तक म्युझिकल ग्रुप प्रस्तुत… “तोच चंद्रमा नभात..” हा समाज बांधवांसाठी मराठी हिंदी गाण्यांनी सजलेला कार्यक्रम आयोजित केला होता.
दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा महोत्सव अतिशय हर्षोल्होसात महाराष्ट्र आर्य वैश्य कमिटी कडून साजरा केला जातो त्याला मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे, विरार येथून समाजबांधव उपस्थित राहतात. यावर्षी देखील सर्वांचा लक्षणीय सहभाग होता. नोकरीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या लवकर भेटी होत नाहीत पण अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने एक छोटेसे स्नेहसंमेलनच महाराष्ट्र आर्य वैश्य समाज मुंबई घडवून आणत आहे.
यावर्षी अंकुश हाडवळे यांच्या सप्तक म्युझिकल ग्रुपच्या पराग दामुद्रे, तुषार कुमार, सतीश परब, क्षमा खडतरकर, सुवर्णा शेळके, राजश्री आडीवरेकर या गायक गायिकांनी मराठी हिंदी गाणी गाऊन रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तसेच अंकुश हाडवळे यांनी सादर केलेल्या झिंगाट गाण्यावर सर्वांनी मनमुराद नृत्य करून वातावरण संगीतमय करून टाकले.
आर्य वैश्य भगिनी मधु बच्चेवार यांनी देखील दोन गाणी गाऊन आपले गायन कौशल्य सर्वांसमोर प्रस्तुत करून वाहवा मिळवली. तसेच किशोर कुमार म्हणून मित्रवर्गामध्ये प्रसिद्ध असलेले मोहन नळदकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सीमा नळदकर यांनी बहारदार गीत सादर करून उपस्थितांना गाण्यावर ठेका धरायला लावला.
महाराष्ट्र आर्य वैश्य कमिटीच्या सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम उत्तम रीतीने संपन्न होण्यासाठी हातभार लावला. सचिव केदार नळदकर, खजिनदार सचिन बोकीलवार आणि सुचित्रा कुंचमवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमानिमित्त एकमेकांना भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. पुढील वर्षी देखील असाच बहारदार कार्यक्रम घेतला जावा अशी कमिटीला सर्व सदस्यांनी प्रेमळ मागणी केली आणि शेवटी कार्यक्रमाची सांगता सहभोजन आणि दुग्धपानाने झाली.