You are currently viewing सावंतवाडीत पत्रकार बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

सावंतवाडीत पत्रकार बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

सावंतवाडी

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून राज्यातील पत्रकार बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला. येथील उपजिल्हा रुग्णालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील उपस्थित पत्रकारांनी या सेवेचा लाभ घेतला.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम पाटील, डॉ.अभिजीत चितारी, डॉ.मुरली चव्हाण, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत, हरिश्चंद्र पवार, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई, सचिव अमोल टेंबकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, मोहन जाधव, भूषण आरोसकर, सचिन रेडकर, शुभम धुरी, निखिल माळकर, अजय गोंदावळे, बंटी राजपुरोहित, महेश धुरी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना श्री.पाटील म्हणाले, आरोग्य सेवा बजावत असताना येथील पत्रकारांचे आपल्या यंत्रणेला मोठे सहकार्य होत आहे. समाजाचा आरसा असलेल्या पत्रकारांनी कोरोना संकट काळात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत अविरत आपली सेवा बजावली आहे. असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तर राजकारण करत असताना राजकारणातील बारकावे हे आम्हाला पत्रकारांकडून शिकायला मिळत असतात, आम्ही केलेले कार्य ते लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळेच राजकारणात आम्हाला यश मिळत असते असे सांगत केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करु असा विश्वास श्री.तेली यांनी व्यक्त केला.
श्री.परब म्हणाले, आपण नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत असताना आपण केलेल्या कार्याचा सकारात्मक आढावा पत्रकारांनीच येथील नागरिकांसमोर ठेवला त्यामुळेच आपण सहज विजय मिळवू शकलो असे सांगत यापुढेही पत्रकारांचे सहकार्य आपल्याला लाभू दे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांकडून सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाला राज्याचा आदर्श पत्रकार संघ पुरस्कार मिळाल्याने कौतुक करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा