सावंतवाडी :
कोरोनाच्या संकट काळात लाॅकडाऊनचा फायदा उठवत आंबोली वनपरिक्षेत्र विभागाच्या सांगेली उपवडे भिडेगुंडा या जंगलात सुमारे ४७ सागवान अवैधरीत्या तोडण्यात आल्याचे समोर आले आहे. तोडलेले सागवान १९ असून ते वनखात्याने जप्त केले आहेत, असे वनक्षेत्रपाल यांनी म्हटले आहे.सागवान तोडणारे मात्र वनखात्याला मिळाले नसल्याचे साांगण्या आले.
आंबोली वनपरिक्षेत्र विभागातील सांगेली उपवडे या वनखात्याच्या जंगलात भिडेगुंडा या भागात ४७ सागवानांची कत्तल करण्यात आली. कोरोनाच्या संकट काळामध्ये हे सागवान तोडण्यात आले आहे.
याठिकाणी सागवान मुळासकट तोडण्यात आले नसून ते मनमानेल तसे तोडण्यात आले आहेत सुमारे पाच लाख रुपये किंमतीचे सागवान वनखात्याच्या मालकीचे असून ते अवैधरित्या तोडण्यात आले आहेत. जंगल पार्टी करत वनखात्याचे साग तोडणाऱ्या वीरप्पनानी सागवान उचलण्यापूर्वी वनखात्याचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि ते जप्त करण्यात आले आहेत. मात्र कोरोनाच्या संकट काळामध्ये जंगल तोड करणाऱ्या या विरप्पनांची चौकशी करून ताब्यात घेण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, आंबोली वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, त्या ठिकाणी ४७ सागवान नव्हे तर १९ सागवान तोडल्याची माहिती आहे आणि हा सर्व तोडलेला सागवान सावंतवाडी उपरकर डेपोमध्ये जप्त करण्यात आला आहे. सागवान तोडणारे वनखात्याच्या ताब्यात मिळाले नाहीत पण सागवान ते पळवून नेऊ शकले नाहीत.याबाबत सखोल चौकशी केली जात आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांनी दिली.
सागवान तोडल्याची माहिती सांगेली घोलेवाडी गावातील जागरूक नागरिकांनी दिली. ते म्हणाले, सामाजिक कार्यकर्ते श्री कविटकर यांनी मदत केली. त्यामुळे त्यांच्या पाळीव रेड्याच्या मदतीने वनखात्याने सागवान खाली आणले. प्रत्यक्षात वन गार्ड श्री. शिखरे यांना सागवान तोडणारे विरप्पन माहित आहेत.