You are currently viewing शमी-कोहलीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला केले पराभूत

शमी-कोहलीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला केले पराभूत

या विश्वचषकात सलग पाच सामने जिंकणारा पहिला संघ

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या २१ व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. या विश्वचषकात भारताचा हा सलग पाचवा विजय आहे. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आता भारताचे १० गुण झाले आहेत. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात सर्व १० गडी गमावून २७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४८ षटकांत ६ गडी गमावून २७४ धावा केल्या आणि सामना चार विकेटने जिंकला.

 

न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक १३० धावा केल्या. रचिन रवींद्रने ७५ आणि ग्लेन फिलिप्सने २३ धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (१७ धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच आणि कुलदीप यादवने दोन बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

 

भारताकडून विराट कोहलीने ९५ धावांची खेळी खेळली. रोहित शर्माने ४६ आणि रवींद्र जडेजाने नाबाद ३९ धावा केल्या. श्रेयसने ३३, राहुलने २७ आणि गिलने २६ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने दोन बळी घेतले. त्याचवेळी बोल्ट-हेन्री आणि सँटनर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

 

धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला आलेल्या किवी संघाची सुरुवात विशेष झाली नाही. डेव्हॉन कॉनवे खातेही न उघडता सिराजचा बळी ठरला. विल यंगही १७ धावा करून शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला. १९ धावांवर दोन गडी बाद झाल्यानंतर रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडच्या डावाची धुरा सांभाळली. पॉवरप्ले संपल्यानंतर किवी संघाची धावसंख्या ३४/२ होती. न्यूझीलंडची धावसंख्या १३ षटकांत ५० आणि २१ षटकांत १०० पार केली. रवींद्रने ५६ चेंडूत तर मिशेलने ६० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी मिळून न्यूझीलंडची धावसंख्या १५० धावांच्या पुढे नेली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी १५९ धावांची भागीदारी झाली. न्यूझीलंडची तिसरी विकेट १७८ धावांवर पडली. रवींद्र ७५ धावा करून शमीचा दुसरा बळी ठरला.

 

मिशेलने लॅथमसह न्यूझीलंडची धावसंख्या २०० धावांच्या पुढे नेली. मात्र, लॅथम पाच धावा करून कुलदीपच्या चेंडूवर बाद झाला, पण मिचेलने स्थिरता दाखवली. त्याने १०० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या. कुलदीपने फिलिप्सला २३ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर तंबूमध्ये पाठवले. सहा धावा करून चॅपमनही बुमराहचा बळी ठरला. शमीने न्यूझीलंडच्या डावाच्या ४८व्या षटकात सँटनर आणि मॅट हेन्रीला त्रिफळाचीत केले. डावाच्या शेवटच्या षटकात त्याने मिशेलला १३० धावांवर बाद केले आणि सामन्यातील पाचवी विकेट घेतली. शेवटी, किवी संघाला ५० षटकात सर्व गडी गमावून २७३ धावा करता आल्या. भारताकडून शमीच्या पाच बळींव्यतिरिक्त कुलदीपने दोन आणि बुमराह-सिराजने प्रत्येकी एक बळी घेतला.

 

२७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. रोहित आणि गिलने मिळून आठव्या षटकातच संघाची धावसंख्या ५० धावांच्या पुढे नेली. पॉवरप्लेमध्ये भारताने एकही विकेट न गमावता ६३ धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा ४६ च्या वैयक्तिक धावसंख्येवर फर्ग्युसनचा पहिला बळी ठरला. यानंतर गिलही २६ धावा करून फर्ग्युसनचा बळी ठरला. कोहली आणि श्रेयसने भारताची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली, त्यादरम्यान धुक्यामुळे खेळ थांबवावा लागला.

 

आकाश निरभ्र झाल्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. तिसर्‍या विकेटसाठी विराट आणि श्रेयसमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली, पण बोल्टने श्रेयसला पायचीत टिपले. श्रेयसने ३३ धावा केल्या. कोहलीने राहुलसह टीम इंडियाची धावसंख्या १५० धावांच्या पुढे नेली. या जोडीने अर्धशतकी भागीदारीही केली. मात्र, राहुलही २७ धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहलीने आपले अर्धशतक ६० चेंडूत पूर्ण केले, मात्र विराटच्या चुकीमुळे सूर्यकुमार यादव वैयक्तिक दोन धावांवर धावबाद झाला.

 

१९१ धावांवर पाच विकेट गमावल्याने टीम इंडिया अडचणीत दिसत होती. अशा स्थितीत कोहली आणि जडेजाने डावाची धुरा सांभाळली. या दोघांनी भारताची धावसंख्या २०० धावांच्या पुढे नेली. अर्धशतकी भागीदारी करत या जोडीने भारताची धावसंख्या २५० धावांच्या पुढे नेली आणि टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली. मात्र, विराट कोहलीने षटकार खेचून शतक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या या लालसेने तो झेलबाद झाला. मात्र, जडेजाने चौकारांसह सामना संपवला आणि भारताला या विश्वचषकात सलग पाचवा विजय मिळवून दिला.

 

या सामन्यात रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी सुरुवातीपासूनच कुलदीप यादववर दबाव आणला होता. किवी फलंदाजांनी आपल्या पहिल्याच षटकात खूप धावा केल्या होत्या. या कारणास्तव कुलदीपने पहिल्या पाच षटकात एकही विकेट न घेता ४८ धावा दिल्या. मात्र, नंतर त्याने दडपण निर्माण केले आणि दोन बळीही घेतले. याशिवाय त्याने इतर गोलंदाजांना चांगले सहकार्य केले. त्याच्या शेवटच्या पाच षटकांमध्ये त्याने २५ धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या.

 

या विश्वचषकात मोहम्मद शमीला पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने शानदार गोलंदाजी केली. त्याने पहिल्याच चेंडूवर विल यंगला तंबूमध्ये पाठवले. यानंतर खेळपट्टीवर स्थिरावलेल्या रचिन रवींद्रला बाद करत १५९ धावांची भागीदारी मोडली. शेवटी त्याने तीन विकेट घेत न्यूझीलंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. त्याने १० षटकात ५४ धावा देत पाच बळी घेतले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.

 

या सामन्यात डॅरिल मिशेल आणि रचिन रवींद्र यांनी शानदार फलंदाजी केली. हे दोघेही खेळपट्टीवर आले तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या १९/२ होती. यानंतर दोघांनी सावध फलंदाजी करत तिसऱ्या विकेटसाठी १५९ धावांची भागीदारी केली. त्यानी फिरकी गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके खेळले आणि वेगाने धावा केल्या. दोघांनीही अनेक विक्रम आपल्या नावावर केले. विश्वचषकाच्या इतिहासात न्यूझीलंडसाठी एखाद्या जोडीने शतकी भागीदारी करण्याची ही दुसरी वेळ होती. विश्वचषकात भारताविरुद्ध न्यूझीलंडची ही सर्वोच्च भागीदारी ठरली.

 

भारताचा पुढील सामना २९ ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध होणार आहे. तर न्यूझीलंडचा पुढील सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारताने विजयासह गुणतक्त्यात १० गुणांसह अव्वल स्थान प्राप्त केले असले तरीही निव्वळ धावसंख्या न्यूझीलंडपेक्षा कमी आहे. भारताच्या पुढील सामन्यापूर्वी अनेक संघ त्यांचे दोन दोन सामने खेळणार आहेत. भारतीय संघाला अधिकची विश्रांती मिळणार आहे, त्याचा संघाच्या कामगिरीवर कसा परिणाम होईल हे २९ तारीखलाच कळेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा