You are currently viewing कोरोनाने एस. टी. कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

कोरोनाने एस. टी. कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

बस डेपो परिसरात कोरोना चाचणी केंद्र तातडीने सुरू करा : म.न. रा. प.का.से.चे उपाध्यक्ष, महाराष्ट्र, जे.डी. उर्फ बनी नाडकर्णी यांची मागणी

कुडाळ प्रतिनिधी :-

एस टी चालक, वाहक व इतर कर्मचारी यांचेसाठी सिंधुदुर्ग आगार येथे कोरोना चाचणी केंद्र व विलगीकरण कक्ष तातडीने सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म.न.रा.प.का.से. उपाध्यक्ष, महाराष्ट्र, जे.डी. उर्फ बनी नाडकर्णी यांनी
संबंधित प्रशासनाला केली आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक  यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एस. टी.विभागीय कार्यशाळा, गणेशपेठ येथे कार्यरत प्रदीप केणे, यांत्रिक कर्मचारी यांचा दिनांक २६ ऑगस्ट रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला याची दखल घेऊन उपाययोजना करण्यात यावी तसेच मृत स्व. प्रदीप केणे यांच्या कुटुंबाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदत तातडीने जाहीर करण्यात यावी. एस टी विभागीय कार्यशाळा येथे कार्यरत यांत्रिक कर्मचारी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला यामुळे समस्त एस. टी. कर्मचारी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही दुर्दैवी घटना लक्षात घेता सर्व कर्मचारी यांच्या स्वास्थ सुरक्षेसाठी तातडीने बस डेपो परिसरातच कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात यावे. या चाचणीत एखादा कर्मचारी संशयित आढळला तर त्याच्या उपचारासाठी व राहण्यासाठी आगार परिसरात उपलब्ध असलेला हॉल विलगीकरण कक्ष म्हणून तयार करावा जेणेकरून दुर्देवाने बाधित झालेले कर्मचारी तिथे राहून आपला प्राथमिक उपचार करू शकतील. महामंडळाच्या पॅनलवर असलेले डॉक्टर्स यांची आळीपाळीने या केंद्रावर तपासणीसाठी नेमणूक करण्यात यावी. विशेषतः चालक आणि वाहक हे सातत्याने असंख्य प्रवाशांच्या संपर्कात येत असतात त्यामुळे कोरोना संसर्गजन्य रोगाचा धोका या कर्मचारी वर्गास जास्त आहे याची जाणीव ठेऊन नमूद मागणी तातडीने अंमलात आणल्यास याचा फायदा सर्व एस टी कर्मचारी यांना मिळेल व या सोयीमुळे कामावर नियमित येणाऱ्या कर्मचारी वर्गाचा आत्मविश्वास निश्चितच वाढेल. राज्य शासन आणि महामंडळाने जारी केलेल्या कोरोना गाईड लाईन चे पालन होण्यासाठी सर्व सुरक्षा उपाय योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. महामंडळ अधिकारी यांनी कामगारांच्या आरोग्याची दखल घेऊन शासन स्तरावर प्रयत्न करावा व उपरोक्त मागणीची पूर्तता करावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत  जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, पालकमंत्री,  परिवहन मंत्री अनिल परब, म. न. रा. प. का.से.चे अध्यक्ष हरी माळी, राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांना सदर मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी देण्यात आली आहे.
उपरोक्त मागणी लवकर मान्य करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना कामगारांच्या हितासाठी आंदोलनात्मक भूमिका घेईल असा इशारा संघटनेचे पदाधिकारी म.न.रा.प.का.से. उपाध्यक्ष जे.डी. उर्फ बनी नाडकर्णी यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 4 =