You are currently viewing श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आरोसची नवरात्र साजरी होतेय भरगच्च कार्यक्रमांनी

श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आरोसची नवरात्र साजरी होतेय भरगच्च कार्यक्रमांनी

*शनिवारी होणार निमंत्रितांची भजन स्पर्धा*

 

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुक्यातील निसर्गसंपन्न आरोस गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिर येथे श्रीदेवी माऊली नवरात्रोत्सव मंडळातर्फे गेली अनेक वर्षे मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. पंचक्रोशीतील अनेक गावकरी या नवरात्र उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात. यावर्षी देखील नवरात्र उत्सवाची धामधूम मोठ्या उत्साहाने सुरू असून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल देखील पहावयास मिळत आहे. नवरात्र उत्सवासाठी संपूर्ण आरोसचे गावकरी एकजुटीने श्रीदेवी माऊली मंदिरात कार्यक्रमाचा आस्वाद घेतात. दिवसभर भक्तांकडून श्रीदेवी माऊलीचे दर्शन आणि ओटी भरणे आदी कार्यक्रम सुरू असतात.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने श्री देवी माऊली मंदिर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये पंचक्रोशीतील स्त्रियांची फुगडी, खेळ पैठणीचा, जुगलबंदीचे भजनाचे कार्यक्रम, वेगवेगळ्या दशावतारी नाट्य मंडळांची नाटके, चपई नृत्य, दांडिया इत्यादी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. *त्याचबरोबर नवरात्र उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे निमंत्रित भजन मंडळांची भजन स्पर्धा.*

आरोस हा ग्रामदेवता, हाकेला धावणारा पावणारा श्री देव गिरोबा, श्रीदेवी माऊली, रवळनाथ आणि , महादेव, वेताळ भूतनाथ, अशी बारा पंचायतनांची ख्याती सर्वदूर पसरलेला भक्तीने ओतप्रोत भरलेला गाव आहे. आरोस येथील श्रीदेवी माऊलीला केलेला नवस हा गिरोबा मंदिरातही फेडता येतो आणि गिरोबाचा नवस श्रीदेवी माऊली मंदिरामध्ये फेडता येतो असे त्यांचे नाते आहे. गिरोबाला पेढे केळ्यांचा मान देतात तर माऊलीची खणा नारळाने ओटी भरतात. माऊली मंदिराच्या उजव्या बाजूला देवस्थानचा मेळेकरी श्री देव रवळनाथाचे मंदिर असून त्याच्याच बाजूला महादेव मंदिर व वेताळ भूतनाथ अशी बारा पंचायत देवतांची मंदिरे आहेत. गिरोबा मंदिर हे माऊली मंदिरापासून काहीसे दूर अंतरावर आहे. गावातील सर्व धार्मिक उत्सव देवस्थानचे प्रमुख मानकरी नाईक, परब तसेच इतर मानकरी व सर्व गावकरी मिळून एकत्र निर्णय घेऊन करतात. त्यामुळे गावातील सर्व कार्यक्रम एकजुटीने आणि एकदिलाने पार पडतात. श्रीदेव गिरोबा व देवी माऊलीला कौल लावण्याची देखील प्रथा गावात पहावयास मिळते. श्रीदेवी माऊली, गिरोबा, रवळनाथ यांचे जत्रोत्सव देखील अलोट गर्दीत पार पडतात. गावात होळी उत्सव देखील दिमाखदार असा होतो, यामध्ये रोंबाट, त्याचप्रमाणे गावात कळस फिरवून घरोघरी न्हावन (तीर्थ) वाटून गावाचे शुद्धीकरण केले जाते. श्रीदेवी माऊली मंदिर येथे होणारा दसरोत्सव हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम असतो. यावेळी शिवलग्न पार पडल्यावर प्रथेप्रमाणे कलमाचे सोने लुटले जाते, त्यानंतर पाचपावनेर झाल्यावर देवस्थानाच्या धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते. अनेक वर्षे आरोस गावाने देवकार्याची परंपरा जपली आहे.

आरोस गावात प्रत्येक वाडीची वेगवेगळी भजन मंडळे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भजन कला कोकणवासीयांनी पूर्वीपासून जपली आहे. संगीत भजन, वारकरी भजन असे भजनाचे प्रकार जिल्ह्यात पहायला मिळतात. गणेशोत्सवाच्या महिना दोन महिने आधीपासून गावागावांमध्ये भजनांची तालीम सुरू होते. यावेळी वेगवेगळ्या चालींवर अभंग, गवळण, रूपक आदी बसवून तयारी करतात. त्यावेळी जिल्ह्यातील वातावरण भक्तिमय संगीतमय होऊन जाते. या भजनांमध्ये पायपेटी, हातपेटी, तबला, पखवाज, ढोलकी, झांज, टाळ आदि विविध वाद्य वापरली जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील याच भजन कलेला प्रोत्साहन देण्यासाठी श्रीदेवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आरोस यांनी निमंत्रितांची भजन स्पर्धा आयोजित केली आहे. शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी 7.30 ते 11.30 या वेळेत श्री देवी माऊली मंदिर येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. भजन स्पर्धेतील विजेत्या मंडळाला प्रथम पारितोषिक रू.7000/- चषक सन्मानचिन्ह, द्वितीय रू.5000/- चषक सन्मानचिन्ह, व तृतीय रू.3000/- चषक सन्मानचिन्ह आणि उत्तेजनार्थ बक्षिसे रू.2000 चषक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट तबला वादक, उत्कृष्ट पखवाज, उत्कृष्ट हार्मोनियम, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट कोरस, स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ प्रत्येकी रुपये 500/- चषक व सन्माचिन्ह देण्यात येतील. सदर भजन स्पर्धेची पारितोषिके श्री.निखिल आनंद नाईक, श्री. दीपक परशुराम पटेकर, श्री.संदेश सगुण देऊलकर, श्री.भाई देऊलकर, श्री.विनायक देऊलकर, श्री.अक्षय देऊलकर, श्री.अमर नाईक, श्री. कृष्णा नाईक, श्री हनुमंत दळवी, श्री.रितेश नाईक, श्री.सत्यवान नाईक, श्री.महेश कुबल यांनी पुरस्कृत केली आहेत. स्पर्धेसाठी श्री.यशवंत केशव नाईक, श्री अमोल गाळेलकर, श्री प्रणव न्हावी, श्री सिद्धू कुबल, कुमारी सिद्धी देऊलकर, श्री.प्रथमेश फटी नाईक, श्री आनंद सुरेश राऊळ हे विशेष पुरस्कर्ते लाभले आहेत.

श्रीदेवी माऊली मंदिर आरोस येथे होणाऱ्या या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भजन स्पर्धेला रसिक प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थित रहावे आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, त्याचप्रमाणे सोमवार दिनांक 23 ऑक्टो. रोजी होणाऱ्या सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचा देखील अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीदेवी माऊली सार्व.नवरात्रउत्सव मंडळ आरोस तर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा