कुरुंदवाड : प्रतिनिधी
देणगीदार शैक्षणिक विकासासाठी देणगी देतात.त्यातून बहुजनांच्या मुलांनी शिक्षणाच्या प्रवाहात राहून स्वतःचे भविष्य घडविले तरच त्या देणगीचा उपयोग होऊन शाश्वत पिढी उदयाला येईल असे प्रतिपादन साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब उर्फ दा. आ.पाटील यांनी केले.
शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील हेरवाड हायस्कूलमध्ये नवीन वर्ग खोली बांधकाम भूमिपूजन व पाया खुदाई कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी देणगीदार विजयाताई इचलकरंजे, कुबेर इचलकरंजे, साने गुरुजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर कनवाडकर, सचिव अजित पाटील, ग्रामस्थ रावसाहेब पाटील,दिलीप पाटील- चिपरीकर, इंजिनियर विपिन खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रावसाहेब पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील बहुजनांच्या मुला – मुलींना शिक्षण मिळावे, या उद्देशाने राष्ट्र सेवा दलातील समाजवादी विचारवंतांनी या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून चार माध्यमिक शाळा चालवल्या जातात.त्यापैकी साने गुरुजी विद्यालयाची इमारत सोडता हेरवाड व शेडशाळ या ठिकाणी शालेय इमारती नव्हत्या. तथापि हेरवाड या ठिकाणी संस्था आणि गावातील देणगीदारांच्या मदतीने इमारत उभी केली.पण निधी अभावी सर्व सुविधा देण्यास खूप वेळ लागला. तरीही संस्था आणि देणगीदारांच्या माध्यमातून आता बऱ्यापैकी सुविधा निर्माण झाल्या आहेत. मात्र आता सांगलीच्या सौ.विजयाताई इचलकरंजे व त्यांचे पती कुबेर इचलकरंजे यांनी भरघोस अशी देणगी दिल्याने सर्व सुविधा पूर्ण होतील.त्याचा फायदा तुम्ही मुला मुलींनी घेतला तरच देणगीदारांच्या मदतीचा उपयोग होईल व त्यांना आनंद होईल.
प्रारंभी साने गुरुजींच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे कुबेर इचलकरंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांच्या तसेच सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन व पाया खुदाई करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कलाशिक्षक धनंजय धोत्रे यांनी करून दिला. सौ.मनीषा डांगे यांनी सूत्रसंचलन केले. जमीर मुल्ला यांनी आभार मानले. यावेळी साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ जयश्री थोरात, संचालक राजेंद्र आलासे, राजेंद्र मालगावे, निखिल आलासे, संदीप आवटी तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.