शासनाचा निर्णय; सिंधुदुर्गासह बाहेरून येणा-या रुग्णांना बसणार फटका…
पणजी :
गोवा-बांबुळी येथे हॉस्पिटल परिसरात कालपासून “पे-पार्किंग” सुरू करण्यात आलेले आहे. चार तासापेक्षा कमी थांबणाऱ्या व्यक्तीला पन्नास रुपये, तर दिवसभर थांबणाऱ्या व्यक्तीला चारशे रुपये इतका चार्ज आकारला जाणार आहे. याचा फटका सिंधुदुर्गसह बाहेरून येणा-या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना बसणार आहे. याबाबतचा निर्णय गोवा शासनाच्या वतीने घेण्यात आला. याची अंमलबजावणी कालपासून करण्यात आली. मात्र हॉस्पिटल सारख्या ठिकाणी पार्किंग करण्यात येऊ नये, रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना अशा प्रकारे त्रास देण्यात येऊ नये, अशी तीव्र नाराजी गोमंतकीयाकडुन कडून व्यक्त करण्यात आली. या सर्व गोष्टीचा थेट परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना सहन करावा लागणार आहे. सिंधुदुर्गातून गोवा मेडिकल कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण नेले जातात. कमी खर्चात सेवा मिळत असल्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असते, मात्र अशा प्रकारे पे पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्यामुळे त्याचा फटका सिंधुदुर्गातील लोकांना बसण्याची शक्यता आहे.