*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री पल्लवी उमेश कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*(४)चौथी माळ………*
मला भावलेलं स्त्रीत्व🙏
नवदुर्गाच्या नऊ स्तोत्रांसहित…🙏
नवदुर्गा मंत्र
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी
तृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,
पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति च
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।।
||चतुर्थ देवी कूष्माण्डा नमस्तुभ्यम ||
देवी कूष्माण्डा॥
सुरासम्पूर्णकलशम् रुधिराप्लुतमेव च।
दधाना हस्तपद्माभ्याम् कूष्माण्डा शुभदास्तुमे ॥४॥
अर्थ…..
अमृताने परिपूर्ण भरलेला कलश धारण करणारी आणि कमळ पुष्पाने युक्त अशी तेजःपुंज मां कूष्मांडा देवी चे आशीर्वाद आम्हांला सर्व कार्यात शुभदायी ठरू देत.
आज फिरायला संध्याकाळची बाहेर पडले होते. मला रस्त्यावरून बरेच माय लेकरांच्या जोड्या दिसल्या.लेकरं शाळेतून परतत होती..आईच्या खांद्यावर आपल्या दप्तराचे ओझे देऊन मस्त आईचे बोट पकडून उड्या मारत आणि चिवचिवत जात होती. आई बाई पण चक्क आपल्या पोरांचे बोल ऐकत हसत जात होती….कुणी माय मोबाईल बघत नव्हती, की त्यावर बोलत नव्हती…पूर्ण लक्ष त्यांचे मुलांच्या बोलण्याकडे होते…हे खूप सुंदर दृश्य मी अनुभवत होते.
लहानपणी मुलांचे सर्वस्व असते ती त्याची आई. आधी तिला सोडून शाळेत जायचे म्हणजे कर्मकठीण काम. पण शाळा सुटल्यावर शाळेबाहेर उभी असलेली माय बघितल्यावर वासरागत येऊन चिकटते पिल्लू . आणि मग उधळत घरी येते…
आईला काय सांगू न काय नको असे होत असते लेकराला….आणि जी आई ते सर्व बोल ऐकत त्याला दाद देते, ती माय लेकराची जोडी जगात सर्वात श्रीमंत असते.मग ती जोडी झोपडीत असेल ,नाही तर महालात….काही फरक पडत नाही.
आज आईवर खूप साऱ्या लोकांनी लिहिले आहे…मी वेगळं काय सांगणार? आई असतेच खूप भारी..आपल्या लेकरांना जन्मा आधीपासून सांभाळत हलकेच या जगात आणून त्यांचा सर्व प्रकारे सांभाळ करणारी ही आई असते. जरा नजरे आड गेलं आपल बाळ, तर कासाविस होते ती आई. रडणार बाळ पण आईला बघताच तिला चिकटून आपल रड विसरते… गाय वासरांची जोडी पण बघतो आपण..
गाय चरून आल्यावर आपल्या वासराकडे कशी पळत जाते, हे आपण बघितले असेल ….
‘हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय.’
तशीच ही आई असते.
‘ आई ‘ या दोन शब्दातच इतकी जादू आहे , की ती मां किंवा ममा,मम्मा म्हणण्यात नाही.आई नावातच सौंदर्य आहे, नजाकत आहे, प्रेम आहे,आत्मीयता आहे आणि जवळीक आहे..आणि आई उच्चारताच याची हृदयी चे त्या हृदयी सर्व काही पोहचते..लेकराच्या सर्व गोष्टी जाणते ती आई.
आई चे ऋण कधीच फिट नाही म्हणतात ते खरे आहे.जितकं आपली आई आपल्याला ओळखते, तितकं आपला पार्टनर पण जीवनभर एकत्र असून ओळखू शकत नसतो. आणि आईची इतिकर्तव्यता कधी संपतच नाही… मुलं झाली की त्यांचे संगोपन…अगदी लग्ना पर्यंत सगळ करतेच,पण त्यांना मुलं झाली तरी ती त्यांचे ही संगोपन करण्यात रमते ती आई…..म्हणून मी म्हणते की एकदा स्त्री प्रेग्नंट झाली, की ती आयुष्यभरासाठी अडकते आपल्या संसारात. मुलं बाळ हेच तिचे विश्व बनते.
आई कधी रिटायर होत नाही म्हणतात ते हेच.
आजच्या आया ह्या खूप गुंतलेल्या दिसतात.त्यांच्या पायाला भिंगरी लावलेली दिसते. त्या मल्टी टास्किंग करतात… तारेवरची कसरतच म्हणा न! पूर्वी आईला मुलांची सर्व जबाबदारी घ्यावी लागत नसे.कारण एकत्र कुटुंब पद्धत असल्याने काकू,आत्या,आजी या मुलांच्या जबाबदारी वाटून घेत असत…कुणी एक स्वयंपाक करत, तर कुणी जेवायला वाढत, कुणी अभ्यास घेत,तर कुणी लहान लेकरांना सांभाळत…पण
आजच्या स्त्रिया जॉब करतात, त्यामुळे स्वतंत्र राहतात. या नवऱ्याच्या बरोबरीने कमावतात. निर्णय घेतात. घरचे बाहेरचे बघतात…शिवाय मुलं बाळ झाल्यावर त्यांचे ही तितकेच जबाबदारीने करतात…..त्यांच्या या लाईफ स्टाईल मुळे डे केअर या संस्था म्हणून उदयाला आल्या. त्यातिथे मुलांचे संगोपन होते. आई घरी येताना मुलांना घेऊन येतात . घरी आल्या नंतर तर मुलांचे अभ्यास, इतर गोष्टी,खेळ , क्लास ,प्रोजेक्ट ,विविध परीक्षा सर्व सांभाळून या आया परत स्वत:साठी वेळ देताना दिसतात, ते ही हसतमुखाने… भारी कौतुक वाटते हो अशा स्त्रियांचे…त्या हे सर्व करत आपले छंद म्हणजे डान्स,गाणे, लिखाण किंवा इतर काही.. हे जपत असतात…म्हणून कोण कौतुक वाटते मला.
कालची किंवा आजची स्त्री ही किती शिकली किंवा किती नाही शिकली, कमावती असो की न कमावती, चांगली वाईट कशी ही असो ….पण ती आई झाली की ती एकच असते…आपल्या मुलाची माय. त्या बाबतीत ती वेगळी असूच शकत नाही. मुलाला प्रसंगी मारेल,रागावेल पण त्याच्या भल्यासाठीच. ती प्रेम करते ते आतून अगदी मनापासून …आपले सर्वस्व देईल ती आपल्या मुलाला… मुलं पुढे कशी ही वागली तरी प्रत्येक आई ही एकसारखीच वागेल…म्हणजे त्याच्या प्रत्येक हाकेला ओ देणारी…एकच असते ही माय.
आई ची शारीरिक रूपे अनंत आहेत…पण आंतरिक हृदय हे ‘ आई ‘ म्हणून सर्वांचे एकच आहे.
म्हणून म्हणातात न आई आहे तो पर्यंत तुम्ही खूप श्रीमंत असता… तुम्हांला स्वत:ला हे कळतच नसते. आई असताना आपण तिला गृहीत धरतो . हवे तसे बोलतो. आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ती असते. प्रत्येक संकटात ती जवळची मदतनीस आणि पहिल्या हाकेला धावून येणारी तीच असते. आपले काळीज काढून नेणाऱ्या लेकराला तुला लागलं तर नाही न बाळा…म्हणणारी आईच असते.
पण अशा आईचे महत्व मात्र ती दूरच्या प्रवासाला कायमची निघुन गेल्यावरच का कळते माहित नाही.
आभाळा एवढा कागद आणि समुद्रा एवढी शाई घेतली, तरी आईची माया लिहायला जागाच नाही…..एवढी महती तिची….
आई नावातच सर्व अर्थ दडून आहेत…मी अजून काय सांगणार बापडी….माझे ही शब्द अपुरेच आहेत…
आई ही कुणाची ही असो चांगलीच असते,आई म्हणून ती कायम पवित्र असते. मग ती श्रीमंत,गरीब, भिकारी,सेक्स वर्कर्स किंवा वेश्या व्यवसाय करणारी का असेना…आपल्या मुलांसाठी ती तेवढीच पवित्र आणि प्रामाणिक असते.
एकच सांगते,
आई ही आई असते…
तुझी माझी सारखीच असते…..
आई ही आई असते…
तिचा अपमान कुणी करू नये….
आई म्हणजे परिपूर्ती असते..
ओंजळ तिची कधी रीती नसते……
आई नावाची जादू असते…
भीती पल्याड तिची सावली असते….
आई प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असे नसते…
आशीर्वाद स्वरूप ती कायम हृदयी वसते….
प्रत्येक जन्माला येणाऱ्या स्त्रीला आईचा किताब मिळालाच हवा….दुर्देवाने जर काही अडचण आली तर तिने दत्तक घेऊन आईपण जरूर अनुभवावे…तो तिचा हक्क आहे, हे सर्वांनी लक्षात घेऊन तिच्या पाठी उभे रहावे.
तर आज नवरात्रीच्या चौथ्या दिवशी मी अशा सर्व मातांना त्यांच्यातील ” आई ” तत्वाला आजची माळ अर्पण करते.
‘मातृदेवो भव ‘🙏
“या देवी सर्वभुतेषु, मातृरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः” ॥
……………………………………………..
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर
१८/१०/२३