You are currently viewing (१) पहिली माळ…

(१) पहिली माळ…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री पल्लवी उमेश कुलकर्णी लिखित नवरात्र निमित्त अप्रतिम लेख*

 

(१) पहिली माळ……

मला भावलेलं स्त्रीत्व🙏

नवदुर्गाच्या मंत्र व नऊ स्तोत्रांसहित…🙏

 

नवदुर्गा मंत्र

प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी

तृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,

पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति च

सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,

नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।।

 

|| प्रथम देवी शैलपुत्री नमस्तुभ्यं ||🙏🙏

“वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।

वृषारूढाम् शूलधरां शैलपुत्री यशस्विनीम्॥”

 

अर्थ…..मनोकामना पूर्ण करणाऱ्या मस्तकी अर्धचंद्र धारण केलेल्या नंदिवाहन आणि त्रिशूल धारण करणाऱ्या शैलपुत्री देवीला नमस्कार असो.🙏

 

एकदा पुण्याहून मी जयसिंगपूर ला येत होते..खंबाटकी घाटात मला एक सुरेख दृश्य दिसले.एक साधारण 32/35 वयाची स्त्री जीन्स आणि लाँग कुडता त्यावर ओढणी एका बाजूने घेऊन बांधलेली… आणि त्या ओढणीच्या आधाराने पाठीमागे 7/8 वर्षाचे मुल बांधले होते. विशेष म्हणजे ती मुलगी मोटरसायकल /यामाह ऐटीत चालवत होती. मला खरचं खूप कौतुक वाटले.मला ती घोड्यावर बसलेली आणि हाती तलवार घेऊन बाळासह चाललेली वीरांगना झाशीची राणी वाटली क्षणभर….

किती तरी वेळ तिच्यात माझा जीव गुंतला होता… विचार करत होते मी. मोटरसायकल चालवत मुलांना एका गावाहून दुसऱ्या गावी नेणे, सुरक्षा म्हणून ओढणी ने बांधणे …फारच कौतुकास्पद आहे हो हे….!

आज या मुली रॉयल इन्फिल्ड सारख्या गाड्या चालवत एकट्या लेह लडाख सारख्या सफारी करतात.

आज खेडेगावातील नऊवारीतील स्त्री सुध्दा मोटारसायकल चालवतात .

पूर्वी स्त्रियांना घरा बाहेर पडायचे म्हणले की पायी पायी जायचे किंवा सायकल, रिक्षा, बस नाहीतर घरातील भाऊ, मुलगा किंवा नवरा यांच्या बरोबर स्कूटरवर नाहीतर मोटर सायकलवर बाहेर जायचे… एवढाच पर्याय असे.

आज जग खूप पुढे गेलं आहे. त्या बरोबर स्त्रिया ही प्रगती पथावर मार्गक्रमण करत आहेत. १९९३साली गिअर शिवाय गाड्या बाजारात आल्या आणि क्रांती झाली. महिला स्वावलंबी झाल्या त्यामुळे. टू व्हीलर गाडी स्वतः चालवू लागल्या. पहिली सनी आली, मग स्कूटी..आणि मग स्कूटी पेप ने तर बाजारच उचलला…त्यानंतर असंख्य गाड्या आल्या आणि घराघरात स्त्रियांसाठी बाहेर पडायचा मार्ग खुला झाला…स्त्रीचे स्वातंत्र्याच्या बाजूचे अजून एक पाऊल पुढे पडले.

आज आपण बघतो, आई आपल्या मुलांना गाडीवर एकटी शाळेत, ट्यूशन, खेळायला, हिंडवायला ई. यासाठी सोडू..आणू शकते..बाजारहाट,नोकरी आनंदाने गाडीवर एन्जॉय करू शकते.आता ती कुणावर आणि कशावर ही अवलंबून राहत नाही. त्यामुळे तिच्यात एक आत्मविश्वास ही आला आहे.

आज तर या टप्यावर आपण आलो आहोत, की गाडी ही जीवनावश्यक बाब धरली जाते.

मी तर या प्रक्रियेची सुरुवाती पासूनच साक्षीदार आहे…अगदी सायकल वर फिरण्याची आमची पिढी….सायकलवरून फिरायची ती हौस ,त्या सफरी, सायकल लावून गप्पा मारणे, सायकल शर्यत….हे आम्ही कॉलेज पर्यंत एन्जॉय केले…नंतर बस मधील मैत्रिणीनं बरोबर एकत्र प्रवास…घरचा स्टॉप येऊ पर्यंत बोरं , चिंचा,आवळे ,कणीस यांचे बस मधे होणारे सामुहिक खाणे…..हे सगळे खूप एन्जॉय केले आहे..

माहित नाही आजच्या मुली हे सर्व करतात का….कदाचित त्यांच्या एन्जॉय करण्याच्या व्याख्या बदलल्या असतील…पण आज मार्क मिळवण्याच्या शर्यतीत आमच्या पीढी सारखा आनंद त्या घेत असतील की नाही माहीत नाही.पण असो..तर सांगायचा मुद्दा हा की सायकल पासून सुरू झालेला आमचा प्रवास गाडी टू व्हीलर ते फार व्हीलर पर्यंत सुकर झाला आहे…आज आम्ही कोणतीही गाडी चालवू शकतो.

आजच्या मुली या रणरागिणी आहेत. आरेला ..कारे म्हणण्याची हिंमत त्यांच्यात आहे,जी आमच्यात क्वचित असायची….नाहीच म्हणले तरी वावगे ठरणार नाही. कोणताही अन्याय आज त्या खपवून घेत नाहीत ..न घरात..न बाहेर ..तसेच एका वेळी त्या अनेक कामे उत्तम करू शकतात. मल्टीटास्किंग हा त्यांच्या अंगवळणी पडलेला गुण आहे …भले स्वयंपाक येत नसेल नीट, पण जीवन उत्तम कसं जगायचं याचा मार्ग त्यांनी शोधलाय . मुलांना स्वतंत्र वाढवतात ..नोकरी निमित्त स्वतंत्र राहतात. त्यामुळे मुलांना ही एकटेच वाढवतात….त्यांचा अभ्यास, छंद, खेळ, आणि स्वतःची कामे ऑफिस…अशी तारेवरची कसरत करत असतात ….

 

आज सासू असलेल्या पिढीवर खूप महत्वाची जबाबदारी आहे.आजच्या पिढीला हे कळत नाही, ते कळत नाही ; म्हणून त्यांच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा त्यांचे कौतुक करायला हवे..दोन पिढीतले अंतर समजून घेऊन त्यांना त्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे. टोमणे मारणे बंद करायला हवे ..जिथे कमी तिथे आम्ही म्हणून योग्यवेळी त्यांच्या मदतीला धावून जायलाच हवे ..

अनाहुत सल्ले देत बसणे, आमच्या वेळी असं नव्हतं , तसं नव्हतं म्हणतं त्यांना सतत उपदेश देण्या पेक्षा, त्यांनी विचारले तर जरूर सल्ला, मार्गदर्शन करायला हवे…

आपण आपली ओळख, आपला सन्मान आपण स्वतः जपायला हवा…तर आपला मान राहील….

जो पर्यंत शक्य आहे तो पर्यंत आपण आपले कार्यरत राहायचं प्रयत्न करायला हवा ..फिरणे चालू ठेवावे .

मग हम किसीसे कम नहीं….असे आपल्याला ही वाटलचं पाहिजे ….आपला घरच्यांना त्रास होणार नाही, ही सिनियर लोकांनी काळजी घ्यायला हवी….तर आपण हवेसे वाटू शकतो..याची जाणीव हवी.

तर जगायची नवी उर्मी मिळते …..

आज या तरुण मुलींचे कौतुक करताना आपण ही आपले कौतुक करायचे …

आपल्या नावावर एक ठपका ठेवला जातो…तो म्हणजे…

‘ बाईच बाईंची शत्रू असते..’ मला वाटतं आता हा ठपका या नवीन पिढीने पुसायला हवा…करा एकमेकींना मोठं…काही बिघडत नाही …स्त्री ही प्रत्येक घराची लक्ष्मी असते, तशीच ती समाजाची पण आदर्श असते…प्रत्येकीत कोणता न कोणता गुण असतोच असतो …तो ओळखा…त्याचे कौतुक करा…बघा आपोआप तुमचे ही एकदिवस कौतुक होईल…नाही झाले तरी हरकत नाही ..आपल्याला स्वत:ला तरी आपले कौतुक असतेच…नव्हे असायलाच हवे…

दिवसातील एक वेळ तरी आपण आरशात स्वतःला पहावे…कोणतेही वय असू दे मग..! दिसते कशी मी…या बरोबर मी किती सुंदर आहे ..मी हे करू शकते, मी ते करू शकते …म्हणत स्वत:चे कौतुक स्वतःच करा…बघा नक्की फरक पडतो..

नवरात्रीत आजच्या या पहिल्या दिवसाची माळ ओढताना ती आपण स्वतःलाच अर्पण करुयात….

स्त्रित्वाचा आदर म्हणजे समस्त स्त्रियांच्या देवत्वाची पूजा…

‘ स्त्रित्वाची जेथ प्रचिती,

तिथे कर माझे जुळती…’

आज घरी दारी स्त्री ही लक्ष्मी रूपाने जन्म घेतेय,लक्ष्मी रूपाने वावरते….तिचा सन्मान करायला हवा…तिचा आदर व्हायलाच हवा.

 

” या देवी सर्वभूतेषू लक्ष्मी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः”

……………………………………………..

©पल्लवी उमेश

जयसिंगपूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा