“संस्कृती संवर्धनात ग्रंथालयांचा मोलाचा वाटा!” – श्रीकांत चौगुले
पिंपरी
“गेल्या शतकात ज्यांच्यामुळे महाराष्ट्राची जडणघडण झाली, ती मोठी माणसे ज्ञानसाधनेतून मोठी झाली. त्यामुळे लोकजीवनात आणि संस्कृती संवर्धनात ग्रंथालयांचा मोलाचा वाटा आहे!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी सोहम् सार्वजनिक ग्रंथालय, संत तुकारामनगर, पिंपरी येथे शनिवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी व्यक्त केले. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आलेल्या वाचनप्रेरणा दिन सोहळ्यात श्रीकांत चौगुले बोलत होते. माजी महापौर योगेश बहल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच संत तुकाराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू कदम, पुणे जिल्हा ग्रंथालय निरीक्षक श्रीकांत संगोपाग, तांत्रिक साहाय्यक प्रमोद ढगे, ज्येष्ठ साहित्यिक धनंजय कुलकर्णी, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक – अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक -युवती आणि शालेय विद्यार्थी लक्षणीय संख्येने श्रोत्यांमध्ये उपस्थित होते.
श्रीकांत चौगुले पुढे म्हणाले की, “ग्रंथातील ज्ञान सर्वांना अवगत व्हावे म्हणून पूर्वीपासून ग्रंथपारायणाची आपल्या संस्कृतीत परंपरा आहे. वाचनातून अनेक महनीय व्यक्ती घडल्या असल्याचे त्यांच्या चरित्रवाचनातून आपल्या लक्षात येते. भौतिक साधनांच्या उपलब्धतेसाठी आणि मानसिक उन्नयन व्हावे म्हणून आजची तरुणाई पुस्तकांसह वेगवेगळ्या माध्यमातून वाचन करीत असते; परंतु अभ्यास आणि अर्थाजन या उद्देशाने वाचन करीत असतानाच निखळ आनंदासाठी ललितग्रंथांचे वाचन केले पाहिजे. उत्तम वाचक जीवनात कधीही पलायनवाद स्वीकारत नाही. याशिवाय पुस्तक वाचनातून एका आयुष्यात अनेक आयुष्य जगण्याची अनुभूती घेता येते!”
याप्रसंगी वाचनचळवळ वृद्धिंगत होण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. योगेश बहल यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “वाचनातून माणसाला परिस्थितीशी संघर्ष करण्याची जिद्द आणि चालना मिळते!” असे मत मांडले. जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविकातून १९९० सालापासून कार्यरत असलेल्या तसेच सद्यस्थितीत मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील सुमारे २६००० ग्रंथसंपदा असलेल्या सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या विविध उपक्रमांची माहिती देताना ग्रंथालयाच्या सुसज्ज अभ्यासिकेचा लाभ घेऊन आजतागायत अनेक विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी झाले आहेत, या गोष्टीचे समाधान आहे, अशी भावना व्यक्त केली. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल वर्षा बोरसे यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२