*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री सीमा शास्त्री मोडक लिखित अप्रतिम लेख*
*थोडंसं मनातलं*
रस्त्यात असता गाईगुरे,
आपण काय करावे बरे??
सध्या ट्रॅफिक म्हणजे डोकेदुखीच झाली आहे. रस्त्यांवरील गाड्या या बऱ्याच वेळेला रहदारीचे नियम न पाळता “पळताना” दिसतात. हो “पळतानाच” कारण चालकाला गाडी रस्त्यावर आणली आहे की एखाद्या स्पर्धेत आणली आहे हेच बहुधा कळत नसावे असं वाटतं.
बरं या गाड्या चालवणारे माणसंच असतात त्यामुळे निदान हॉर्न वाजवल्यावर निदान ते त्यांचा मार्ग बदलतात किंवा वेग कमी जास्त करतात.
पण या गाड्यांच्या तोबा गर्दीत जनावरांचीही गर्दी असते. भर रहदारीच्या रस्त्यात, चौकात, गल्लीबोळात, ब्रिजवर, अगदी शाळा, मैदान, दवाखाने, सार्वजनिक ठिकाणी सुद्धा हे गुरे बसलेली दिसतात, उभी असतात, खेळत असतात, धावत असतात किंवा जोर जोरात मारामारी करून आक्रमक झालेली दिसतात. हे सगळं बेभरवशाचं असतं. त्यामुळे गाडी चालवणारे पायी चालणारे सतत या जनावरांमुळे तणावातच असतात.
बरं या रस्त्यातील गुरांना वाचवण्यासाठी गाडीवाले कसरतही करतात. त्यात बऱ्याच वेळेला अपघात होतात. त्यात गुरांना, प्राण्यांना क्वचितच लागते. बऱ्याच वेळा माणसांना शारीरिक इजा होते.काही वेळा जीवही गमवावा लागतो. पण याबद्दल त्या गुरांच्या मालकाला काहीही ताकीद दिली जात नसावी. किंवा अशावेळी मी त्या प्राण्याचा मालक नाहीच,” तो मी नव्हेच” असे वागले जाते. पण हीच परिस्थिती उलट झाली म्हणजे एखाद्या गाडीखाली एखादे जनावर आले,किंवा जनावराला अगदी थोडंही लागलं तरी त्याचा मालक किंवा रस्त्यावरचे इतर सगळे त्या गाडीवाल्याला मारण्यापर्यंत मजल गाठतात.
अहो, पण थोडा विचार करा. रस्त्यावर मोकाटपणे जनावर सोडणं हे योग्य आहे का? कोंबड्या, शेळ्या, डुक्कर, गायी अशी जनावरे सकाळपासूनच रस्त्यावर दिसतात. ते अगदी संध्याकाळपर्यंत असतात. याचा अर्थ त्या गरीब प्राण्यांच्या खाण्याची, पाण्याची सोयही होत नसावी. पण हे कितपत योग्य आहे? मला वाटतं या जनावरांच्या मालकांना ही ताकीद द्यायला हवी की जनावर कोणत्याही रस्त्यांवर सोडू नये. आणि तसे आढळल्यास त्या जनावरांना पांजरापोळ किंवा अन्य ठिकाणी घेऊन जावे आणि ठराविक रक्कम दंड म्हणून घेऊन मगच त्या जनावरांना मालकांच्या स्वाधीन करावे हा एक मार्ग असू शकतो. यामुळे रस्त्यात अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल. तसेच रस्तेही अस्वच्छ होणार नाही,
रोगराई पसरणार नाही.
अजून एक दुसरा मार्ग हाही असू शकतो की त्या जनावरांच्या मालकांना ते जनावर जिथे पकडले गेले तिथेच बोलावून दंडाची पावती द्यायची आणि तिथूनच त्यांना घरी न्यायला सांगावे. यासाठी जनावरांच्या कानावर किंवा त्यांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी मालकाचा मोबाईल नंबर लिहिणे बंधनकारक करावा. जेणेकरून ट्राफिक पोलिसांना त्या मालकांना फोन करणं सोयीचे जाईल. हा नियम केवळ गाव किंवा शहरापुरताच मर्यादित न ठेवता महामार्गासाठी सुद्धा असावा. जनावरांच्या मालकांना वारंवार दंड द्यावा लागला की ते देखील त्यांच्या जनावरांना कुठेही मोकाट सोडणार नाही अशी अशा वाटते. यामुळे वाहनांचे अपघातही कमी होतील आणि जनावरांनाही उपासमार होणार नाही.बघा आपल्या सगळ्यांना जर ही कल्पना आवडत असेल तर आपणही जनावरांच्या मालकांनाही समज देऊया. आणि रस्त्यावरचे अपघात कमी करूया.
सौ.सीमा श्रीराम शास्त्री मोडक
मुख्याध्यापक डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल
नंदुरबार