You are currently viewing भेडले माडाचे झाड अंगावर कोसळल्याने सावंतवाडीत दोघे ठार..

भेडले माडाचे झाड अंगावर कोसळल्याने सावंतवाडीत दोघे ठार..

भेडले माडाचे झाड अंगावर कोसळल्याने सावंतवाडीत दोघे ठार..

विजेचा धक्का लागल्याचा अंदाज ; मृत अंजिवडेतील, भजनावरून परतताना घडली घटना..

सावंतवाडी

राजवाडा परिसरातील भले मोठे भेडले माडाचे झाड थेट अंगावर पडल्यामुळे अंजिवडे येथील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना वीज वाहिन्यांचा स्पर्श झाल्याचा संशय आहे. ही घटना काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास राजवाड्याच्या बाजूला असलेल्या परिमल टॉवर समोर घडली. राहुल प्रकाश पंदारे (वय २४) व संभाजी दत्ताराम पंदारे (वय २१) रा. गवळीवाडी अशी या दोघांची नावे आहेत. गोठण परिसरात राहत असणारे दशावतार कलाकार गौरव शिर्के यांच्या सोबत भजनासाठी ते आले होते. तेथून परतत असताना हा अपघात घडला.

यातील दोघेही मृत युवक गोठण येथे भजनासाठी आले होते. तेथून दुचाकीने परत जात असताना त्यांच्या अंगावर भेडले माडाचे झाड कोसळले. यात त्या दोघांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती तेथील काही युवकांना कळाली त्यांनी तात्काळ माजी नगराध्यक्ष संजू परब यांना ही माहिती दिली. त्यांनी तात्काळ पालिका व पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी पालिकेचा बंब व रुग्णवाहिका दाखल झाली. कटरच्या साह्याने त्या दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु अंगावर झाडाचा भाग कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर झाडाखाली अडकलेला १ मृतदेह बाहेर काढण्यात आला. अपघात झाल्याचे लक्षात येतात त्या ठिकाणी माजी नगरसेवक संजय पेडणेकर, रवी जाधव, रॉक्सन डान्टस, बाबा अल्मेडा, डॉ. मुरली चव्हाण, हेमंत पांगम, विनायक गावस, लादु रायका, मोसीन मुल्ला, अॅलेक्स डिसोजा आशिष रायकर आदींसह सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, आरोग्य निरीक्षक वैभव नाटेकर, नंदू गावकर आदींनी त्या ठिकाणी मदत कार्यात सहभाग घेतला. कटरच्या साह्याने झाड कापून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हे मृतदेह सावंतवाडी कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. याबाबतची माहिती मिळतात घटनास्थळी व रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, अमित गोते, सुरज पाटील, आदींनी त्या ठिकाणी धाव घेऊन सहकार्य केले. दरम्यान यावेळी सावंतवाडी संस्थांचे युवराज लखनराजे भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली.

याबाबत श्री. गौरव शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार भजन आटोपल्यानंतर शिर्के यांनी त्या दोघांना राजवाड्याच्या पुढील न्यायालयाच्या तिठ्यावर सोडले आणि गौरव हे पॉपस हॉटेलच्या बाजूने निघून गेले. दरम्यान त्यांना अपघात झाल्याच्या कळाले त्यामुळे ते परत आले. यावेळी राहुल याची दुचाकी अपघातग्रस्त झालेली दिसली ते पुन्हा का परतले? हा मात्र आपल्याला प्रश्न पडला, असे सांगून त्यांच्या नशिबानेच घात केला, अशी प्रतिक्रिया उपस्थितीतांतुन व्यक्त करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा