मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला किमान रौप्य पदक निश्चित आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने दोन गडी गमावून ५२ धावा केल्या.
बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव करत भारताने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. या विजयासह भारतीय संघाने किमान रौप्य पदक निश्चित केले आहे. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने १७.५ षटकांत सर्व गडी गमावून ५१ धावा केल्या. केवळ कर्णधार निगार सुलतानाला दुहेरी आकडा पार करता आला. तीने १२ धावा केल्या होत्या. भारताकडून पूजा वस्त्राकरने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. भारताने ८.२ षटकात दोन गडी गमावून ५२ धावा केल्या आणि लक्ष्य गाठले. भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने १५ चेंडूत सर्वाधिक नाबाद २० धावा केल्या. शेफालीने १७ धावांचे योगदान दिले. आता अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना पाकिस्तान किंवा श्रीलंकेशी होणार आहे.