You are currently viewing मालवणात २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत पर्यटन सप्ताहाचे आयोजन

मालवणात २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत पर्यटन सप्ताहाचे आयोजन

मालवणात २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत पर्यटन सप्ताहाचे आयोजन

मालवण

मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयांतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि युवा टुरिझम क्लबतर्फे दि. २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत पर्यटन सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहाचा उद्घाटन सोहळा २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयाच्या कै. नरहरी प्रभूझांट्ये सभागृहात होणार आहे.

पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यापासून सिंधुदुर्गात पर्यटन व्यवसाय आकाराला आला आहे. उद्योग आणि शिक्षण संस्था यांचा मेळ घालून जिल्ह्यातील पर्यटन उद्योग वाढीस लागावा, त्यात धोरणात्मक योगदान देता यावे, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, त्यांना अधिकाधिक रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच विद्यार्थी आणि समाजात पर्यटन व्यवसायाविषयी आणि शाश्वत जबाबदार पर्यटनाविषयी जागृती निर्माण होऊन अधिकाधिक संवाद वाढीस लागावा, या उद्देशाने आमच्या महाविद्यालयाने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून ‘वारसा पर्यटन’ या संकल्पनेवर आधारित ‘पर्यटन सप्ताह’ आयोजित केला आहे. हा सप्ताह २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.

नागपूर येथील भारतीय शिक्षण मंडळाच्या ज्ञान संसाधन केंद्राचे संचालक आणि देशभरातील अनेक विद्यापीठांच्या संग्रहालय, पुरातत्व, सांस्कृतिक इत्यादी समित्यांचे तज्ज्ञ संचालक आणि उत्तम वक्ते डॉ. भुजंग बोबडे या सोहळ्यासाठी उद्घाटक आणि प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकुर यांनी दिली.

जिल्हा आणि मालवण परिसरातील सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने त्यांचे व्याख्यान समस्त मालवणवासीयांसाठी, पर्यटन अभ्यासक आणि पर्यटन व्यावसायिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. ठाकुर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा