You are currently viewing वासुदेव आला आणि लुटून गेला…..

वासुदेव आला आणि लुटून गेला…..

वासुदेव आला आणि लुटून गेला…..

बारामती येथील पाच जणांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जादूटोणा करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा झाला दाखल

कुडाळ

वासुदेव आला हो….. वासुदेव आला….. म्हणत कुडाळ तालुक्यातील वाडीवरवडे, पिंगुळी व कुडाळ कुंभारवाडी येथील अनेकांना जादूटोणा करून हजारो रुपयांना फसविणा-या बारामती येथील ५ जणांना कुडाळ कुंभारवाडी येथे नागरिकांनी प्रसाद देऊन या ५ जणांना पोलिसांच्या ताब्यात दिले या संदर्भात कुडाळ पोलीस ठाण्यात बारामती येथील युवराज वसंत गंगावणे, मालोजी राजू ढवळे, राजू रंगराव ढवळे, संजय रंगराव ढवळे, सुनील वसंत गंगावणे यांच्या विरुद्ध जादूटोणा करून चमत्कार दाखवून पैसे घेऊन फसवणूक केली म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यात वाडीवरवडे येथील महेश पांडुरंग धुरी यांनी तक्रार दाखल केली.

सध्या गणेश चतुर्थी उत्सवाचा सण सुरू असल्याने विविध प्रकारचे लोक सणानिमित्त पैसे मागण्यासाठी दारोदारी फिरत आहेत मात्र कुडाळ तालुक्यातील वाडीवरवडे, पिंगुळी, कुडाळ कुंभारवाडी या ठिकाणी वासुदेव बनून अनेकांना गंडा घातल्याची घटना पुढे आली आहे. याबाबत वाडीवरवडे येथील महेश धुरी यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार बारामती येथील ५ जणांविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जादूटोणा आणि फसवणूक

या तक्रारीत महेश धुरी यांनी असे म्हटले आहे की माझा मुलगा माहिर हा आजारी असल्यामुळे त्याला रुग्णालयातून घरी आणल्यावर त्याच दिवशी वासुदेव म्हणून दोघेजण आले. आणि माझी पत्नी महेश्वरी हिला त्यांनी सांगितले की, तुमच्या मुलाला त्रास आहे तो त्रास दूर करण्यासाठी काही रक्कम लागणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी महेश धुरी हे हजर झाले. त्यांना सुद्धा त्यांनी तेच सांगितले दरम्यान महेश धुरी हे साहित्य आणण्यासाठी गावातील दुकानावरून जाऊन आले. त्यावेळी त्यांच्या मुलाच्या अंगावरून २ हजार ५०० रुपये ओवाळून घेतले तसेच पूजेसाठी २ हजार ५०० रूपये असे ५ हजार रुपये त्यांच्याकडून घेतले. यावेळी महेश धुरी यांच्या हातामध्ये अगरबत्तीचे तुकडे देऊन त्याच्यावर पाणी मारून मंत्र जप केला आणि हे तुकडे हातावर फिरवून दाखविले. आणि महेश धुरी यांची पत्नी महेश्वरी यांच्या हातात दोऱ्याचे दोन तुकडे देऊन त्याच्यावर पावडर मारून हे दोरे एकत्र केले असा जादूटोणा करून या कुटुंबाकडून ५ हजार रुपये घेऊन युवराज गंगावणे व मालोजी ढवळे गेले.

उघड झाली फसवणूक

दरम्यान संध्याकाळी महेश धुरी हे घरातून बाहेर पडल्यावर वाडीवरवडे येथील प्रणय धर्णे, विपुल धुरी, महेश धुरी, मंगेश चव्हाण, कुंभारवाडी येथील अशोक साळगावकर, विनोद दणाणी, राजू वाडयेकर, एमआयडीसी येथील तुकाराम चव्हाण यांच्या बाबतीतही अशी घटना घडल्याचे समजले. त्यानंतर युवराज गंगावणे व मालोजी ढवळे यांना कुडाळ एमआयडीसी कुंभारवाडी येथे पकडल्याचे समजल्यावर सर्वजण त्या ठिकाणी गेले आणि अन्य तिघांनाही त्यांनी बोलावून घेतले. त्यांनी प्रत्येकाकडून रक्कमा घेतलेल्या आहेत. जादूटोणा करून फसवणूक करूनही रक्कम लुबाडलेली आहे. दरम्यान या बारामती येथील पाचही वासुदेवांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुडाळ कुंभारवाडी येथे हे वासुदेव आल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा अनेकांची फसवणूक करण्याचे तंत्र, मंत्र सुरू असताना येथील जागरूक नागरिकांनी हे हाणून पाडले या वासुदेव बनून आलेल्या पाचही जणांना नागरिकांनी चांगला प्रसाद दिला. आणि यासंदर्भात कुडाळ पोलीस ठाण्यात माहिती देऊन या पाचही जणांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा