You are currently viewing जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला मास्क व सॅनिटायझर वाटपाचे नियोजन तातडीने करा….

जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला मास्क व सॅनिटायझर वाटपाचे नियोजन तातडीने करा….

– पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यातील सव्वा दोन लाख घरांमध्ये सॅनिटायझरटे वाटप आणि सुमारे 8 लाख लोकांना प्रत्येकी दोन मास्क चे वाटप करण्यासाठी तातडीने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम व जिल्ह्यातील कोविड – 19 ची सद्यस्थिती यांचा पालकमंत्री श्री सामंत यांनी सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

            या बैठकीस खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आदी उपस्थित होते.

            तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कोविड – 19 ची दुसरी लाट येण्याची शक्यत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबास सॅनिटायझरचे वाटप करायचे असल्याचे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकास दोन मास्कचे वाटप करावयाचे आहे. यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करून जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने कार्यवाही सुरू करावी. प्रत्येकाने मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे ही गरज आहे. तसेच लोकांच्या आरोग्याचा विचार करून ही कारवाई लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनी काम करावे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवण्यात आली आहे. कोरोनावर संपूर्ण नियंत्रण मिळवणे, मृत्यू दर आणखी घटवणे व पॉजिटीव्हीटी दर कमी करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा